ट्रक बंद पडल्याने वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा
चिपळूण
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱया कुंभार्ली घाटातील एका भल्या मोठय़ा खड्डय़ात ट्रक बंद पडल्याने त्यातच वाहनांना ये-जा करण्यासाठी मार्गच नसल्याने या घाटात तब्बल 5 तास वाहतूक ठप्प झाली होती. शनिवारी पहाटे 5 च्या सुमारास ही घटना घडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
सह्याद्रीच्या कुशीतील कुंभार्ली घाट हा कोकणासह पश्चिम महाराष्टाला जोडत असल्याने या मार्गावर कायम वाहनांची रहदारी असते. असे असताना संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या घाटातील रस्त्याची पूर्णतः चाळण झाली असून हा घाटरस्ता पूर्णतः नव्याने करणे गरजेचे बनले आहे. असे असताना शनिवारी पहाटे एका वळणावरच्या भल्या मोठय़ा खड्डय़ात अचानकपणे ट्रक बंद पडल्याने इतर वाहनांना ये-जा करण्यासाठी मार्गच उरला नाही. परिणामी येथील वाहतूक 5 तास ठप्प झाली होती. यामुळे घाटमाथ्यावरून चिपळूणकडे येणाऱया व चिपळूणहून घाटमाथ्याकडे जाणाऱया अन्य वाहनांचा खोळंबा झाला. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या.
पहाटे ठप्प वाहतूक पूर्ववत
या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच पेनच्या सहाय्याने बंद पडलेला ट्रक बाजूला करण्यात आला. यानंतर शनिवारी पहाटे 5 च्या सुमारास ठप्प झालेली ही वाहतूक अखेर सकाळी 10 च्या सुमारास पूर्ववत करण्यात यश आले. यामुळे सर्व वाहने मार्गस्थ झाली.









