वारंवार तक्रार करूनही मनपा अधिकाऱयांचे दुर्लक्ष : सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने गटारी तुंबुन : रहिवाशांचे आरोग्य धोक्यात
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील बहुतांश कॉलनीमध्ये सुविधा पुरविण्यास महापालिका प्रशासनाला अपयश आले आहे. यामुळे खासबाग, कुंतीनगर परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.गटारीतील सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने गेल्या कित्येक दिवसापासून गटारी सांडपाण्याने तुंबून आहेत. परिणामी येथील रहिवाशांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली आली आहे.
शहरवासियांना नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र नागरी सुविधा पुरविण्यास आणि समस्या सोडविण्यास महापालिका प्रशासनाला सपशेल अपयश आले आहे. सुमारे दिडशेहून अधिक घरे असलेल्या कुंतीनगर परिसरात ड्रेनेज आणि सांडपाण्याची समस्या गंभीर बनली आहे. गटारीमधून वाहणारे सांडपाणी येथील खासगी जागेत सोडण्यात आले असल्याने संपूर्ण शेतीमध्ये सांडपाण्याची तळी साचली आहेत. यामुळे शेतकऱयाला पिके घेणे मुष्किल बनले आहे. त्यामुळे पुंतीनगरमधून शेतीमध्ये सोडण्यात येणाऱया गटारीच्या तोंडाला माती आणि दगड घालून वाहणारे सांडपाणी बंद केले आहे. तसेच सांडपाणी शेत जमिनीमध्ये सोडण्यात येऊ नये, अशी सूचना केली आहे. परिणामी वर्षभरापासून सांडपाणी गटारीमध्ये साचून आहे. गटारीचे सांडपाणी आपल्या हद्दीत घेण्यास नकार देण्यात आल्याने ही समस्या गंभीर बनली असून रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सांडपाणी निचरा होण्याचा मार्गच बंद झाल्याने गटारीमध्ये साचून विहिरीमध्ये पाझरत आहे. यामुळे येथील विहिरीचे पाणी पूर्णत: दूषित झाले आहे. दूषित पाण्याचा वापर करणे आरोग्यास धोकादायक बनले आहे. विहिरीमधील पाण्यामुळे त्वचारोग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कुंतीनगरपासून जवळच नाला असल्याने येथील सांडपाणी नाल्यामध्ये सोडण्यात यावे, अशी मागणी केली होती. याबाबत महापालिकेला वारंवार निवेदने आणि तक्रार केली असता, याची दखल घेण्यात आली नाही. येथील समस्येबाबत नागरिकांनी मनपाच्या अधिकाऱयांकडे तक्रार केली असता अधिकाऱयांनी देखील येथील समस्येकडे कानाडोळा केला असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. महापालिका आणि अधिकाऱयांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे. महापालिका प्रशासन मात्र निर्धास्त आहे. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
येथील समस्येची महापालिका आयुक्त व पाणी पुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांनी पाहणी करून आवश्यक उपाययोजना राबवाव्यात आणि येथील समस्येचे निवारण करावे अशी मागणी होत आहे.
घरोघरी दूषित पाणी
सांडपाणी गटारीमध्ये साचून रहात असल्याने जलवाहिनीच्या गळतीद्वारे पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळत आहे. त्यामुळे येथील घरोघरी दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. याबाबत येथील रहिवाशांनी ही बाब महापालिका आणि पाणी पुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांच्या निदर्शनास आणून देऊन निवेदन दिले होते. पण याची दखल घेण्याची जबाबदारी महापालिका आणि पाणी पुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांनी झटकली आहे. परिणामी कुंतीनगरमधील रहिवाशांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे.









