प्रतिनिधी / कुंकळ्ळी
कुंकळ्ळी नगरपालिकेच्या नव्या मंडळाची पहिली बैठक 6 रोजी नगराध्यक्ष लक्ष्मण नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस हजर होते. या बैठकीत स्वातंत्र्यसैनिक स्मारकाजवळच्या उद्यानाच्या डागडुजीचा विषय बराच गाजला. त्याचा खर्च युरी आलेमाव करणार असून हा विषय कार्यक्रमपत्रिकेवर आणल्याबद्दल विरोधकांनी जोरदार हरकत घेतली.
त्यात रॉनी डायस यांनी पालिकेला आपले खासगी निवेदन देऊन घेतलेल्या हरकतीच्या विषयावरून वातावरण बरेच तापले. सदर निवेदन नगराध्यक्ष नाईक यांनी समोर आणले व जोरदार आवाज उठविला. ही बाब नियमांत बसत नसल्यास आठ दिवसांत दाखवा, प्रसंगी राजीनामा देण्याची आपली तयारी आहे, असे नाईक त्यांनी सुनावले व निवेदनाच्या विषयाला पूर्णविराम दिला.
विदेश देसाई यांनी उद्यानाच्या डागडुजीचा खर्च पालिकेला करता येणे शक्मय आहे का ते आधी पाहिले जावे, असे सूचविले. अन्यथा औद्योगिक वसाहतींतील कंपन्यांकडून सीएसआरखाली निधी दिला जाऊ शकतो का हे पाहावे किंवा 14 व्या वित्त आयोगाचा निधी यासाठी वापरता येईल का यासंबंधी पालिका संचालनालयाकडे विचारपूस करावी व नंतरच हा विषय मांडण्यात यावा, असे सांगून यासंदर्भात ठराव घेण्यास देसाई यांनी विरोध केला. त्याचप्रमाणे राहुल देसाई यांनीही खासगी निधी वापरणे योग्य नसल्याचे सुनावले व विरोध केला.
घिसाडघाई नको : आमदार डायस
दरम्यान, आमदार डायस यांनी उद्यानाचा खर्च पालिका निधीतून करावा, निधी नसल्यास सीएसआरमधून व्यवस्था करता येईल असे सांगितले. गरज पडल्यास सरकाकारकडून निधी उपलब्ध होण्याची तजवीज करू. मात्र स्वातंत्र्यसैनिकांचा मान राखला पाहिजे. त्याला हरकत नाही. पण पालिकेने घिसाडघाई करू नये, असे ते म्हणाले. तसेच डायस यांनी खासगी निधी वापरासंबंधीचा विषय आणल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. या मुद्यावर नगराध्यक्ष व काही नगरसेवकांनी हरकत घेतली आणि विषय थांबवणे त्यांना भाग पाडले. त्यानंतर याविषयी पुन्हा चर्चा सुरू झाली व 12 नगरसेवकांनी हरकत नसल्याचे सांगितल्याने ठराव संमत करण्यात आला.









