प्रतिनिधी / मडगाव
कुंकळळी मतदारसंघात भाजपने जर विद्यमान आमदार क्लाफास डायस यांना भाजपची उमेदवारी दिली तर भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते सुदेश भिंसे यांनी आगामी निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवावी यासाठी त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर दबाव आणण्यास प्रारंभ केलेला आहे.
सुदेश भिंसे हे कुंकळळी मतदारसंघात गेली अनेक वर्षे भाजपसाठी जोरदार काम करीत आले आहेत. विद्यमान परिस्थितीत तर आमदाराच्या तोडीची कामे त्यांनी केलेली आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत ते प्रबळ उमेदवार म्हणून बघितले जात आहे. कुंकळळी मतदारसंघात भाजप कुणाला उमेदवारी देणार हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये आलेल्या आमदार क्लाफास डायस यांना उमेदवारी दिली जाणार का ? याकडे कुंकळळी मतदारसंघातील मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.
कुंकळळी मतदारसंघात चांदर-कावोरी, गिरदोली, माकाझान, गुडी-पारोडा, आंबावली व बाळळी या सहा ग्रामपंचायतीचा व कुंकळळी नगरपालिकेचा समावेश होत आहे. या सर्व ग्रामपंचायती तसेच कुंकळळी नगरपालिका क्षेत्रात सुदेश भिंसे यांचा बऱयापैकी लोकसंपर्क असून अनेक समाज उपयोगी उपक्रम त्यांनी राबविले आहेत. चांदर, गिरदोली, माकाझान या भागातील लोकांना वीज बिल करण्यासाठी त्यांनी स्वता सुविधा उलपब्ध केलेली आहे. त्याच पद्धतीने कुंकळळी नगरपालिका क्षेत्रात देखील त्यांनी ही सुविधा उलपब्ध केलेली आहे. पूर्वी लोकांना वीज बिलांचा भरणा करण्यासाठी मडगावला भेट द्यावी लागत होती. मात्र, सुदेश भिंसे यांनी ही सुविधा उलपब्ध केल्याने लोकांची बऱयापैकी सोय झालेली आहे.
कोविड-19च्या काळात त्यांनी लोकांना मोठय़ा प्रमाणात मदतीचा हात दिलेला आहे. दुसऱया लाटेत जेव्हा रूग्णवाहिका व शववाहिका उलपब्ध होणे कठीण झाले होते. अशा वेळी त्यांनी स्वता पुढाकार घेऊन रूग्णवाहिका तसेच शववाहिका उलपब्ध करून दिलेल्या आहेत. जेव्हा या वाहनाचा ड्रायव्हर उलब्ध होत नव्हता अशावेळी स्वता त्यांनी वाहन चालवून लोकांना मदत केलेली आहे. त्याच बरोबर वातानुकूलित शवपेटी देखील उपलब्ध केलेली आहे. त्यामुळे एखाद्यावेळी अंत्यसंस्कार करण्यास विलंब झाला तरी मृतदेह शवपेटीत ठेवणे शक्य होत आहे. सुदेश भिंसे यांची लोकप्रियता व समाज कार्य पाहून त्यांच्या असंख्य समर्थकांकडून त्यांनी विधानसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढविण्यासाठी दबाव वाढविला आहे. अन्य काही राजकीय पक्षाचे नेते देखील त्यांच्या संपर्कात आहेत. या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आपण आपले समाज कार्य अखंडितपणे चालू ठेवले आहे. त्यात खंड पडू दिलेला नाही. भाजपचे नेते आपल्या कार्याची दखल घेतील व आपल्यावर अन्याय होणार नाही अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली.









