सांस्कृतिक प्रतिनिधी/ फोंडा
देव, देश आणि धर्म हे विषय आपल्या संस्कृतीशी जोडलेले आहेत. त्यामुळे या गोष्टींचे संवर्धन हे आपले आद्य कर्तव्य आहे. किर्तनाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा प्रभावीपणे प्रचार आणि प्रसार होणे शक्य आहे, कारण कीर्तन हे लोकशिक्षणाचे आणि प्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे, असे मत दै. तरुण भारतचे निवासी संपादक सागर जावडेकर यांनी व्यकत केले. ‘देव, देश, धर्म व संस्कृती संवर्धन’ या विषयावरील परिसंवादात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.
नागेशी येथील नागेश महारुद्र सभागृहात गोमंतक संत मंडळातर्फे आयोजित केलेल्या 28 व्या निवासी कीर्तन शिबीरातंर्गत हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर डॉ. लता नाईक, डॉ. राजेंद्र बोरकर, ह. भ. प. संध्या पाठक, संगम बोरकर व डॉ. गोविंद काळे हे वक्ते उपस्थित होते.
सागर जावडेकर पुढे म्हणाले, सकारात्मक विचारातून घडून येणारी कृती ही नेहमीच समाजासाठी उपयुक्त ठरते. मात्र अविचारातून घडलेले कृत्य हे संस्कृतीच्या विकासासाठी बाधक असते. म्हणून बाल्यावस्थेपासून मुलांना चांगला बोध करण्याची जबाबदारी पालक व गुरुजनांनी स्वीकारली पाहिजे.
डॉ. लता नाईक म्हणाल्या, स्वावलंबन, नम्रता, शिस्त, उचित वेशभूषा, योग्य केशभूषा या चांगल्या आचरणाशी संबंधीत क्रीया असून त्यामध्ये तन आणि मनाचा सहभाग असतो. त्यासाठी आपले वर्तन चांगले पाहिजे. मुले चांगल्या वातावरणाशी किंवा सहवासाशी कशी जोडली जातील याकडे वडिलधाऱयांचे लक्ष हवे. स्मार्टफोनचा अतिवापर आणि अयोग्य वापर हे वरदान नसून शापच आहे. त्यासाठी स्मार्टफोनचा चांगल उपयोग उमलत्या पिढीला शिकविला पाहिजे.
आरोग्य खात्याचे मुख्य आरोग्याधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर म्हणाले, संस्कृती ही परिस्थितीनुरुप बदलणारी जीवन पद्धती आहे. सनातन संस्कृती म्हणजे जगण्यातला चांगूलपणा असून त्यामध्ये सगळय़ा विश्वाचा विचार आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण होता कामा नये. सध्या भारतीय संस्कृतीकडे बघण्याचा दृष्टीकोन आत्मकेंद्रीत आणि संपुचित बनत चालला आहे. त्यामुळे संस्कृतीची व्याख्याही बदलत चालली आहे. सुवर्तनातून येते ती सुसंस्कृती होय. दृकश्राव्य माध्यमाचा विपरीत परिणाम आजच्या पिढीवर जाणवतो असे त्यांनी नमूद केले.
बीजारोपण विचारपूर्वक आणि सुनियोजित झाल्यास फळही चांगले मिळते, असे संध्या पाठक म्हणाल्या. चिंतन, मननातून आलेले ज्ञान म्हणजेच संस्कार असून बुद्धीच्फा विकासाबरोबरच हृदयाचा विकास होणे अपेक्षित असते. मातृधर्म, पितृधर्म, बंधूधर्म, भगीनीधर्म, पत्नीधर्म, पतीधर्म, आचार्यधर्म, क्षात्रधर्म आदी समाज व्यवस्थेतील दंडक योग्य पद्धतीने पाळल्यास आपली संसकृती टिकेल.
काळाच्या ओघामध्ये टिकून राहते, विकसित होते, सामाजिक सुव्यवस्थेचे यथायोग्य संवर्धन करते ती संस्कृती होय असे संगम बोरकर म्हणाले. मन आणि बुद्धिच्या एकाग्रतेमुळे जीवनोपयुक्त ज्ञान मिळते. तोही संस्कृतीचाच भाग असून आपल्या वर्तनातील गुणवत्ता म्हणजेच संस्कार असल्याचे संगम बोरकर यांनी नमूद केले.
डॉ. गोविंद काळे म्हणाले, देशाबद्दलचा अभिमान प्रत्येक भारतीयाला हवा. देश माझा आहे ही भावना विद्यार्थी दशेपासूनच मुलांमध्ये रुजवली गेली पाहिजे. मानवतेचे संस्कार हे सगळय़ात मोठे असून गुरु आणि किर्तनकार देशप्रेम आणि देशाबद्दलची कर्तव्य भावना याचा अत्यंत परिणामकारक प्रसार आणि प्रचार करु शकतात. आपल्या दैनंदिन जीवनात देशप्रेमाला प्राधान्य हवे असे त्यांनी सांगितले.
नागेश देवस्थानचे अध्यक्ष दामोदर भाटकर यांच्याहस्ते भेटवस्तू देऊन सर्व वक्त्यांचा सन्मान करण्यात आला. ह. भ. प. सुहासबुवा वझे यांनी आभार मानले.









