प्रतिनिधी /फोंडा
विश्व मराठी परिषदेच्या कीर्तन विश्व या यूटय़ुब माध्यमातील कार्यक्रमात गोव्यातील प्रसिद्ध किर्तनकार ह. भ. प. सुहासबुवा वझे यांचे कीर्तन व गोव्यासंबंधी मुलाखत प्रसारित होणार आहे. 15, 17 आणि 18 जुलै या दिवशी हा कार्यक्रम प्रसारित होणार असून त्यात वझेबुवा कीर्तन सादर करतानाच मुलाखतीच्या माध्यमातून गोव्याची संस्कृती व येथील उत्सव परंपरेवर बोलणार आहेत.
महाराष्ट्रातील एकूण 52 नामवंत किर्तनकारांचा या कार्यक्रमात सहभाग असून गोव्यातून सुहासबुवा वझे हे एकमेव किर्तनकार या कार्यक्रमात कीर्तन सादर करणार आहेत. यूटय़ुबच्या माध्यमातून हा कार्यक्रम भारताबरोबरच जगभरातील विविध देशातील कीर्तनप्रेमीपर्यंत पोचणार आहे. वझेबुवांना पुण्याचे कौस्तुभ परांजपे हार्मोनियमवर तर गजानन माऊली व मिलिंद तायवडे हे तबल्यावर तसेच गोव्यातील रुद्राक्ष वझे झांज व दामोदर कामत चिपळीवर साथ करणार आहेत.









