दरपत्रके न लावल्यास फौजदारी कारवाई : घाऊक बाजारापेक्षा जादा दराने विक्री
प्रतिनिधी/ विजय जाधव
एकीकडे कोरोनाविरुध्द सर्वांचीच लढाई सुरु आहे. कोरोनाला हरवण्यासाठी प्रशासन युध्दपातळीवर लढत आहे. लोकांना घरात बसण्याशिवाय पर्याय नाही. संपर्क टाळून संसर्ग रोखण्याचे आव्हान पेलण्याची जबाबदारी नागरिक घरात बसून निभावत असताना त्यांना अत्यावश्यक वस्तू खरेदी करताना लुटण्याचे प्रकार सुरु आहे. किराणामाल, भाजी विक्रेत्यांकडून हा प्रचंड काळाबाजार सुरु असून यावर प्रशासनाने चढय़ा दराने विक्री केल्यास फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे.
किराणामाल दुकानातून धान्यापासून ते अगदी रोज वापरातील वस्तूंच्या किंमती अव्वासव्वाच्या आकारल्या जात आहेत. याबाबत दुकानदारांना ग्राहकांनी विचारणा केल्यास होलसेल दर वाढले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, कोणीही होलसेल करणाऱया वितरकांनी मालाच्या किंमती वाढवलेल्या नाहीत. मात्र दुकानदार नागरिकांची दिशाभूल करत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. होलसेल दरात भाजीपाला, किराणा माल घेऊन मनमानी दराने विक्री केली जात आहे. नियमाप्रमाणे दरपत्रक लावून मालाची विक्री न करणाऱयांवर दंडात्मक आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
सातारा शहर आणि परिसरात किराणा दुकानात आणि किरकोळ भाजी विक्रत्यांनी मनमानी दराने करून लॉकडाऊनमध्ये अक्षरशः लुटालूट सुरू केली आहे. दर्शनी भागात दरपत्रक न लावता मालाची विक्री करणाऱयांच्यावर फौजदारी आणि दंडात्मक कारवाई होत असताना अद्यापही कोणावरही अशी कारवाई न झाल्याने ही लुटालूट होत आहे. फिरुन भाजीपाला विक्री करणारे तर लॉकडाऊनचा पुरेपूर गैरफायदा घेत चारपटीने नफा कमवत आहेत. कोरोनापेक्षा किराणा आणि भाजीपाला विक्रेते नफा कमवण्याच्या नादात माणुसकीला न शोभणारे वागत असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, खुद्द सातारा शेती उत्पन समितीच्या सभापतींनाच या काळय़ाबाजाराचा फटका बसला असल्याचा अनुभवही त्यांनी शेअर केल्यामुळे जिल्हा प्रशासनाने हा काळाबाजार रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे
विक्रेत्याविरोधात तक्रार आल्यास कारवाई होणार
बाजार समितीकडून घाऊक दराने माल खरेदी केल्यानंतर तो विक्री करण्यासाठी साताऱयात 170 वाहनांना परवानगी देण्यात आलेली आहे. या वाहनातून विक्री करणाऱया विक्रेत्यांकडून सर्वच भाजीपाला व फळभाजी दुप्पट दराने विक्री करण्यात येत आहे. याबाबत जे विक्रेते असा काळाबाजार करत आहेत त्यांच्या गाडी क्रमांकासह सातारा पालिकेकडे तक्रार करावी, असे आवाहन मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी केले आहे.
दर पत्रक नाही, कारवाई व्हावी
बाजार समिती रोजच्या रोज दर निश्चित करून भाजीपाला विक्रीवर नियंत्रण ठेवते. जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी भाजीपाला, किराणा मालाच्या दराबाबत धोरण निश्चित केले पाहिजे. दरपत्रक न लावता विक्री करणाऱयांच्यावर गुन्हे दाखल करून परवाना रद्द केला पाहिजे, असे बाजार समितीचे सभापती ऍड. विक्रम पवार यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
दारु व मटण घरपोच सेवा
लॉकडाऊनमुळे दारु विक्री बंद असताना अंजठा चौक व पोवईनाक्यावरील जुनी भाजी मंडई, सदरबझार, मोळाचा ओढा परिसरातून दारुचा काळाबाजार सुरु आहे. दहा पट दराने दारु विक्री घरपोच केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरु आहे. घरपोच मटण, चिकन पोहोचवण्याची सुविधा सुरु असून मटणाचा दर 700 ते 800 रुपये तर चिकण 100 ते 150 रुपये दराने विक्री करण्यात येत आहे. एकूणच लॉकडाऊनच्या काळात मानवताही न जपणाऱया या अवैध दारु विक्रीसह मटण विक्रेत्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.
ब्लॅक कलरची ऍक्टिव्हा विकतेय गुटखा
सातारा शहरात ब्लॅक कलरच्या ऍक्टिव्हावरुन दोन युवक साताऱयात गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांची काळय़ाबाजारात विक्री करत आहेत. हे युवक दुचाकीवरुन एकीकडे पोलिसांना पिण्याचे पाणी पुरवत असल्याचा बहाणा करत डिकीतील गुटखा, तंबाखू, सिगारेट ठराविक दुकानांमध्ये विक्रीसाठी देत आहेत. दुकानदार गुटखा, तंबाखू चौपट दराने विक्री करत असून हे युवक लॉकडाऊनमध्ये चांगलेच मालामाल झाल्याची माहिती समोर आली आहे. आता पोलिसांना देखील त्यांच्यापासून सावध रहावे लागेल.








