वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकावलेल्या भारताच्या किदाम्बी श्रीकांतने विश्व बॅडमिंटन फेडरेशनने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत चार स्थानांची प्रगती करीत पुन्हा एकदा टॉप टेनमध्ये स्थान मिळविले आहे.
28 वर्षीय श्रीकांतला स्पेनमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील कामगिरीचा फायदा झाला असून त्याने आता दहावे स्थान मिळविले आहे. युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननेही या स्पर्धेत पदार्पणातच कांस्य मिळविण्याचा पराक्रम केला. त्यानेही क्रमवारीत दोन स्थानांची प्रगती करीत 17 वे स्थान मिळविले आहे. बी. साई प्रणीतची मात्र दोन अंकानी घसरण झाली आहे. तो आता 18 व्या स्थानावर आहे. एचएस प्रणॉयने स्पेनमधील स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारली होती. यामुळे त्याला सहा स्थानांची झेप घेता आली असून तो आता 26 व्या स्थानावर आहे.
महिलांमध्ये पीव्ही सिंधू सातव्या स्थानावर कायम असून सायना नेहवाल या क्रमवारीत 25 व्या स्थानावर आहे. तिला वारंवार दुखापती होत असल्याने क्रमवारीतील स्थान राखणे तिला कठीण जात आहे. पुरुष दुहेरीची जोडी चिराग शेट्टी-सात्विकसाईराज रनकिरेड्डी यांची एका अंकाने घसरण झाल्याने ते 10 व्या स्थानावर पोहोचले आहेत तर महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा-एन.सिक्की रेड्डी यांनी टॉप 20 मध्ये पुन्हा एकदा स्थान मिळविले आहे.









