अध्यक्षपदी स्नेहल लोहार : उपाध्यक्षपदी मल्लाप्पा पाटील यांनी बाजी मारली : समान मते पडल्याने चिठ्ठीद्वारे निकाल
वार्ताहर/ किणये
किणये ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये ग्राम पंचायतीवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा झेंडा फडकविण्यात आला. अध्यक्षपदी स्नेहल शंकर लोहार यांनी तर उपाध्यक्षपदी मल्लाप्पा विष्णू पाटील यांनी बाजी मारली. शुक्रवारी किणये ग्राम पंचायतीच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. किणये ग्राम पंचायतीमध्ये किणये, बहाद्दरवाडी, शिवनगर, रणकुंडये, नावगे, जानेवाडी, बामणवाडी व कर्ले या गावांचा समावेश आहे. एकूण 22 सदस्य या पंचायतीमध्ये आहेत. अध्यक्षपदासाठी मागासवर्गीय अ महिला तर उपाध्यक्षपदासाठी सामान्य असे आरक्षण जाहीर झाले होते. आरक्षण जाहीर झाल्यापासून ग्राम पंचायतीवर म. ए. समितीचे वर्चस्व आणण्यासाठी गेल्या पाच-सहा दिवसांपासून या भागातील म. ए. समितीच्या नेत्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून किणये ग्राम पंचायतीवर पुन्हा एकदा म. ए. समितीची सत्ता निर्माण झाली आहे. अध्यक्षपदासाठी अर्चना रामलिंग चिगरे व स्नेहल शंकर लोहार असे दोन अर्ज दाखल झाले. अर्चना चिगरे यांना 11 मते व स्नेहल लोहार यांनाही 11 मते मिळाली. दोन्ही महिलांना समान मते पडल्यामुळे चिठ्ठीद्वारे अध्यक्षपदाची निवड करण्यात आली. यामध्ये स्नेहल लोहार (कर्ले) यांची निवड झाली. उपाध्यक्षपदासाठी किणये गावातून हेमंत पाटील, बहाद्दरवाडी गावातून मल्लाप्पा विष्णू पाटील व रणकुंडये येथून भरमाण्णा यल्लाप्पा पाटील अशा तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यानंतर हेमंत पाटील यांनी अर्ज माघार घेतला. मल्लाप्पा पाटील यांना 14 मते तर भरमाण्णा पाटील यांना 7 मते मिळाली. यामध्ये उपाध्यक्षपदासाठी मल्लाप्पा पाटील यांनी बाजी मारली. आनंद अन् जल्लोष किणये भाग हा म. ए. समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. ग्राम पंचायतीवर भगवा फडकविल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड प्रक्रियेला ग्राम पंचायतीचे सर्व 22 सदस्य हजर होते. निवडणूक अधिकारी म्हणून जगन्नाथ जंगमशेट्टी यांनी काम पाहिले. यावेळी पीडीओ सुनीता पाटील या उपस्थित होत्या. म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष केला.









