वैज्ञानिकांनी दिली माहिती : मानवी वर्तनामुळे येणार स्थिती
कोरोना विषाणू एक वर्षानंतरही अमेरिका तसेच भारतासह जगातील अनेक देशांमध्ये मोठय़ा संख्येत लोकांना बाधित करत आहे. परंतु काही वर्षांमध्ये कोरोना महामारी एंडेमिक (स्थानिक) ठरणार असल्याचे अमेरिकेच्या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. हा आजार लोकांदरम्यान इन्फ्लुएंजा आणि सामान्य सर्दीप्रमाणे कायम राहणार आहे, परंतु हा काही भाग किंवा लोकांपर्यंत मर्यादित राहिल आणि हे सर्व काही मानवी वर्तनामुळे घडणार आहे.
प्रत्येक विषाणूचा असतो एक पॅटर्न
ऋतू बदलल्यावर दिलासा मिळेल, उन्हाळय़ात विषाणू संपेल असे पूर्वी म्हटले गेले होते, परंतु असे घडले नाही. काही विषाणू कसे वर्तन करतात म्हणजे कशाप्रकारे आजार फैलावतात हे आम्ही जाणतो, त्यांचा ऋतूच्या हिशेबाने एक पॅटर्न असतो, उदाहरणार्थ इन्फ्लुएंजा ऋतूआधारित आजार आहे, हा हिवाळय़ात प्रभावी असतो, परंतु उन्हाळय़ात याचा प्रभाव दिसून येत नसल्याचे जॉर्जटाउन येथील ग्लोबल इंफेक्शन डिसिज प्रोग्रामच्या संचालिका एलेन कार्लिन यांनी म्हटले आहे.
अन्य विषाणूंपेक्षा वेगळा
कुठल्याही विशेष ऋतूत विषाणू प्रभावी होणे अनेक पैलूंवर निर्भर असते. म्हणजेच श्वसनसंबंधी विषाणू हवामानातील दमटपणा आणि तापमानाने प्रभावित होतो, कारण दमटपणा आणि तापमानच ड्रॉपलेट्स आणि हवेतील कण कशाप्रकारे वर्तन करतील हे ठरवितात. परंतु कोरोना विषाणूचे प्रकरण वेगळे आहे. येथे ऋतूपेक्षा मानवी वर्तन विषाणू कसा आणि किती फैलावेल यासाठी जबाबदार असल्याचे ग्लोबल इंफेक्शन डिसिज प्रोग्रामचे सहाय्यक संशोधन प्राध्यापक कोलनि कार्लसन यांनी म्हटले आहे.
संक्रमण लोकांमुळेच घटणार
उन्हाळय़ात अमेरिकेच्या काही हिस्स्यांसमवेत काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रभाव वेगाने कमी झाला, परंतु असे ऋतूमुळे नव्हे तर शासकीय निर्बंधांमुळे लोकांना गर्दीत जाण्यापासून रोखण्यात आले, मास्क परिधान करण्यावर भर देण्यात आला आणि शारीरिक अंतराचे पालन करण्यास सांगण्यात आले. यातून रुग्णसंख्या कमी झाली, तर याच काळात अमेरिकेच्या अनेक प्रांतांमध्ये अधिक रुग्ण सापडत होते. यातून कोरोना विषाणूचे रुग्ण वाढणे किंवा कमी होणे हवामानापेक्षा मानवी वर्तन ठरवित असल्याचे सिद्ध होते, असे कार्लिन म्हणाल्या.
भविष्यात कोरोना ठरणार हंगामी
लोकसंख्येचा मोठा हिस्सा या विषाणूकरता इम्यून होत नाही तोवर कोरोनाचा धोका राहणार आहे. मोठी लोकसंख्या इम्यून झाल्यावर संक्रमणाचा दर कमी होणार आहे. त्यानंतर विषाणू स्थिर होईल आणि आमच्यासोबत राहणार आहे. एकदा ही स्थिती आल्यावर हा विषाणू ऋतूच्या हिशेबाने वाढणार किंवा कमी होणार असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.