चीनचे विदेशमंत्री पाकिस्तानच्या दौऱ्यावर : भारत-पाकने चर्चेद्वारे सोडवावा विषय
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
गोव्यात पार पडलेल्या एससीओ बैठकीनंतर चीनचे विदेशमंत्री किन गँग हे पाकिस्तानात पोहोचले. तेथे त्यांनी पाकिस्तानचे विदेशमंत्री बिलावल भुट्टो यांच्याशी चर्चा केली आहे. या चर्चेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत चीनच्या मंत्र्यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात दीर्घकाळापासून काश्मीर वाद सुरू आहे, या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रस्ताव आणि द्विपक्षीय करारांनुसारच तोडगा काढला जावा. तसेच दोन्ही देशांनी काश्मीरसंबंधी कुठलाच एकतर्फी निर्णय घेऊ नये असे चीनच्या विदेशमंत्र्यांनी म्हटले आहे.
चीनचे विदेशमंत्री गँग यांचा हा पहिलाच पाकिस्तान दौरा आहे. इस्लामाबादमध्ये ‘पाकिस्तान-चीन सामरिक चर्चेची चौथी फेरी समाप्त झाल्यावर दोन्ही देशांकडून संयुक्त वक्तव्य जारी करण्यात आले. काश्मीर प्रश्न युएन चार्टर, सुरक्षा परिषदेचे प्रस्ताव आणि द्विपक्षीय करारांनुसारच सोडवावा. एकतर्फी निर्णयांमुळे स्थिती आणखी बिघडू शकते, असे गँग यानी म्हटले आहे. याचबरोबर दोन्ही देशांच्या विदेश मंत्र्यांनी सीपीईसीबद्दल प्रतिबद्धता व्यक्त केली आहे.
चीन, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे शेजारी देश आहेत. पाक-अफगाणिस्तानने एकत्र येत स्वत:चे द्विपक्षीय संबंध सुधारावेत. तालिबान सर्व जाती-धर्माच्या लोकांना समान अधिकार देईल, अशी अपेक्षा असल्याचे किन यांनी म्हटले आहे.
सीपीईसीवर चर्चा
सीपीईसीला चालू वर्षात एक दशक पूर्ण होणार आहे. सीपीईसीमुळे पाकिस्तानात सामाजिक, आर्थिक विकास, रोजगार आणि लोकांचे राहणीमान सुधारले असल्याचे विधान भुट्टो यांनी केले आहे. सीपीईसीत चीनकडून 60 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येत आहे. सीपीईसी हा प्रकल्प पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्याने भारताने याला विरोध दर्शविला आहे. सीपीईसीमुळे चीनला अरबी समुद्रापर्यंत थेट रस्तेसंपर्क प्राप्त होणार आहे.
पाकिस्तानात दहशतवादाची फॅक्टरी
भारताने दहशतवादाचा दंश झेलला आहे. दहशतवादाला पोसणारा पाकिस्तान स्वत: पीडित असल्याचे ढोंग करत आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानची प्रतिमा त्याच्या विदेशी भांडाराप्रमाणेच खालावलेली आहे. पाकिस्तान हा जगभरात दहशतवादी निर्यात करणारा देश आहे. सीमापार दहशतवाद रोखण्यासाठी भारत शक्य ते सर्व प्रयत्न करत असल्याचे भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी अलिकडेच म्हटले आहे. भारत आणि चीन यांच्यातील संबंध सामान्य नाहीत. सीमेवरील तणावाकरता चीनच जबाबदार असल्याचे जयशंकर यांनी सुनावले होते.
आता केवळ पीओकेवर चर्चा
पाकिस्तानसोबत भारत काश्मीर मुद्द्यावर कुठलीच चर्चा करणार नाही. आता केवळ पाकिस्तानव्याप्त काश्मीरवर चर्चा होईल. पाकिस्तानला पीओकेवरील स्वत:चा कब्जा दूर करावा लागणार असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.









