भारताच्या महिला अधिकाऱयाने पाकिस्तानला ठणकावले
वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रसंघ महासभेतील संबोधनात पुन्हा काश्मीर राग आळवला आहे. जम्मू-काश्मीर वादाच्या तोडग्यावर दक्षिण आशियातील स्थायी शांतता अवलंबून आहे. इम्रान खान यांच्या या दुष्प्रचाराला भारताच्या एका कनिष्ठ महिला अधिकाऱयाने चोख प्रत्युत्तर दिले आहे. संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या राजनयिक अधिकारी स्नेहा दुबे यांनी इम्रान यांना दिलेले प्रत्युत्तर पाहून त्यांचे सर्वच स्तरांमधून कौतुक होत आहे.
स्नेहा यांनी संयुक्त राष्ट्रसंघ महासभेत इम्रान यांच्या संबोधनावर राइट टू रिप्लायचा वापर करत चोख प्रत्युत्तर दिले आहे. पूर्ण जम्मू-काश्मीर आणि लडाख नेहमीच भारताचा अविभाज्य हिस्सा आहे आणि राहणार आहे. यात पाकव्याप्त काश्मीरचा हिस्सा देखील सामील आहे. पाकिस्तानने स्वतःच्या ताब्यातील भाग त्वरित सोडून द्यावा. पाकिस्तानचा इतिहास दहशतवाद्यांना पोसण्याचा आणि त्यांना मदत करण्याचा राहिल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य देश चांगलेच ओळखून असल्याचे स्नेहा यांनी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठाचा वापर भारताच्या विरोधात असत्य फैलावणे आणि जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानकडून होण्याची ही पहिलीच वेळ नाही. पाकिस्तानात दहशतवादी उघडपणे वावरत असतात. ओसामा बिन लादेनला पाकिस्ताननेच आश्रय दिला होता. एवढेच नाही तर पाकिस्तानी सरकार आज देखील लादेनला शहीद म्हणत असल्याचे सांगत स्नेहा यांनी इम्रान खान यांच्या सर्व दाव्यांमधील हवा काढून घेतली आहे.
पाकिस्तानात अल्पसंख्याकांची गळचेपी
पाकिस्तानला बहुलतावाद समजून घेणे अवघड आहे, पाकिस्तान अल्पसंख्याकांची गळचेपी करत आला आहे. दहशवाद्यांना पोसणारा पाकिस्तान ते केवळ शेजारी देशांना नुकसान पोहोचवतील अशी अपेक्षा करत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाकडून बंदी घालण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे सर्वाधिक आदरातिथ्य करण्याचा विक्रम पाकिस्तानच्याच नावावर आहे. आमचे क्षेत्रच नव्हे तर पूर्ण जग पाकिस्तानच्या या कुरापतींमुळे त्रस्त आहे. दुसरीकडे पाकिस्तान स्वतःच्या सांप्रदायिक हिंसेला दहशतवादाच्या आड लपविण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्नेहा यांनी सुनावले आहे.
स्नेहा दुबे यांची पार्श्वभूमी
स्नेहा दुबे 2012 च्या तुकडीच्या आयएफएस अधिकारी आहेत. त्यांचे शालेय शिक्षण गोव्यात पार पडले आहे. त्यानंतर उच्च शिक्षण पुण्यातील फर्ग्युस्न महाविद्यालयातून तर एमफिलचे शिक्षण जेएनयूमधून त्यांनी पूर्ण केले आहे. 2011 मध्ये पहिल्याच प्रयत्नात युपीएसी परीक्षेत त्यांनी यश मिळविले होते. त्यांची पहिली नियुक्ती विदेश मंत्रालयात झाली होती. त्यानंतर 2014 मध्ये त्यांना माद्रिद येथील भारतीय दूतावासात पाठविण्यात आले होते. सध्या त्या संयुक्त राष्ट्रसंघात भारताच्या फर्स्ट सेक्रेटरी आहेत.









