बोरे म्हटलं की शबरीने रामाला दिलेल्या उष्टय़ा बोरांची गोष्ट आठवते. या बोरांची चव चाखण्यासाठी सर्वजण आतुरलेले आहेत. सध्या हिवाळय़ाचे दिवस आहेत, यामुळे बाजारात विविध फळांचे आगमन झाले आहे. रसरशीत आणि रंगीबेरंगी फळांनी बाजारपेठेचे रुपडे बदलले आहे. नवीन आणि सर्वांनाच खावीशी वाटणाऱया फळांचा यामध्ये समावेश आहे. सध्या बोरांचा मौसम असल्याने रुचकर आणि गोड अशा बोरांची बाजारात चलती आहे.
बोरं ही फळे तशी प्रत्येकाच्या आवडीची असल्याने प्रत्येकाकडून याची खरेदी आवर्जुन केली जाते. यामध्ये पिवळसर आणि हिरवा अशा दोन रंगामध्ये हे फळ आढळून येते. मकर संक्रांत जवळ येत असून भोगीसाठी याचीसुध्दा खास खरेदी केली जाते. संक्रांतीमध्ये लहान मुलांना बोरन्हाणं शिवाय हळदी-कुंकूचे कार्यक्रम ठेवले जातात, अशावेळी महिलांकडून बोरांच्या खरेदीवर अधिक भर दिला जातो.
स्वस्त आणि मस्त असे हे गोड फळ सध्या बाजारात सर्वत्र उपलब्ध झाले असून उमराण, चण्यामण्या बोर, चमेली, चेकनेट, बकुळा बोर, बनारसी बोर आदी प्रकार बाजारात मिळतात. लहान पिवळसर बोरे ही 30 ते 40 रुपये किलो तर हिरवी मोठी बोरे 20 ते 40 रुपये किलो दराने विक्री होत आहेत. चाहत्यांकडूनही दररोज याची खरेदी केली जात आहे. याशिवाय शबरीची लहान गोड आंबट बोरेही सध्या बाजारात ठिकठिकाणी पहावयास मिळत आहेत. मिठाची फवारणी करुन शालेय विद्यार्थी याचा आस्वाद घेताना पहावयास मिळतात. महाराष्ट्रासह अन्य भागात बोरांचे उत्पादन घेतले जाते.
औषधी गुणधर्मः बोर हे खाण्यास रुचकर आणि पचण्यास हलके असतात. रक्तशुध्दीकरण करण्यास मदत करते. वात, पित्त व कफादी त्रिदोष कमी करते, अपचनासारख्या विकारांवर फायदेशीर असे हे फळ आहे.
शिवानी पाटील








