केळघर / वार्ताहर :
महाबळेश्वरवरून केळघरला येताना काळाकडायेथील वळणावर एका प्रवाशाला सोमवारी रात्री 11.30 च्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले.
काळाकडा या घाटात रस्त्याचे दुरूस्ती काम चालू असल्याने रस्त्यावरून सुरक्षित प्रवास करणे अवघड झाले आहे. अशातच जर अचानक समोर बिबट्यासारख्या प्राण्याचे दर्शन झाले तर दुचाकीवरील प्रवाशांची काय अवस्था होईल? याचा विचारही करता येत नाही.
रात्री चारचाकी वाहनातून केळघरला येताना एका व्यक्तीला अवघड वळणावर अचानक रस्त्यात बिबट्याचे दर्शन झाले. त्या प्रवाशाने गाडी थांबवून त्याचे व्हिडीओ व फोटो काढले. या रस्त्याने दुचाकीस्वारांना प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. तसेच या परिसरातील शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांनाही धोका आहे . गेल्या वर्षी कुरूळोशी, वरोशी, वाटंबे येथील शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ले झाले होते. त्यामुळे वनविभागाने त्यांच्या संरक्षित वनक्षेत्रास जाळीदार कुंपण करावे व घाट रस्ता व खाजगी चराऊडोंगर सुरक्षित करावे, अशी मागणी प्रवासी व गावकऱ्यांकडून केली जात आहे.









