फार फार पूर्वी अनेक विकार असे होते की त्यांचा त्रास सहन होत नसे आणि लोकलज्जेमुळे चारचौघात ते सांगता येत नसे. सोशल मीडिया ऊर्फ समाजमाध्यमे आल्यापासून लोकलज्जा नावाचे प्रकरण पूर्णपणे बाद झाले. पूर्वी सहन न होणाऱया आणि सांगता न येणाऱया अनेक गोष्टी माणसे तिथे अभिमानाने लिहू लागली. आता तिथे येणाऱया इतर लोकांना हे लेखन सहन कसे करायचे आणि आवडत नाही हे कसे सांगायचे असा प्रश्न पडला. लॉकडाऊनच्या काळात ही दु:खे फार तीव्र झाली आहेत. घरात नवरा-बायको दोघेच राजाराणीचा संसार करीत असतील तर ‘तुम्ही मला वेळ देत नाही’ ही बायकोची तक्रार थांबली आहे. उलट ‘वेळ नको, पण लॉकडाऊन आवर’ असे काही जोडपी मनातल्या मनात म्हणू लागली आहेत. बायकोने केलेला पदार्थ आवडला नाही तर बाहेर जेवायला जाण्याची सोय संपली आहे. लॉकडाऊनच्या आधी आपली सासू नणंदेकडे गेली असती आणि तिकडेच अडकून पडली असती तर बरे झाले असते असे अनेकींना वाटू लागले आहे, फक्त बोलून दाखवत नाहीत. लॉकडाऊनच्या आधी आपली मैत्रीण किंवा मेहुणी आपल्या घरी आली असती तर पण तो अनैतिक विषय नको.
स्वतःला घरात कोंडून घेऊन करणार तरी काय? एका मित्राच्या चष्म्याची काडी तुटली आहे. चष्मा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत नाही. त्यामुळे तोच वापरणे भाग आहे. पूर्वी परपुरुषाशी बोलताना स्त्रिया उगीचच पदर सावरायच्या. त्याप्रमाणे त्याला वाचन वगैरे करताना सतत चष्मा सावरावा लागतो. एका हातात मोबाईल आणि दुसऱया हाताने चष्मा सावरून व्हॉट्सअप विद्यापीठात भ्रमंती करताना त्याची फार तारांबळ उडते.
व्हॉट्सअपचा कंटाळा आला म्हणून टीव्ही लावला तर सतत फिदी फिदी हसणारे वृत्तनिवेदक बघितल्यावर वाटते-काही चांगली बातमी असेल. पण ते सांगतात, कोरोनामुळे इतके मरण पावले, कोरोनाबाधितांच्या यादीत भारत टॉप टेनमध्ये गेला. अमुक गावात आठवी पास माणसाने गोमूत्रापासून कोरोनावर औषध बनवले. पाक किंवा चीनशी युद्ध झाले तर आपण हे करू, ते करू.
तिथून पळ काढला तर फेसबुकवर कवी ‘लाईव्ह’ येऊन विचारतात, ‘मी दिसतोय/ दिसतेय का? आवाज येतो का?’ आणि कविता वाचायला सुरुवात करतात.
एकूण काय, काळ तर मोठा कठीण आलाय.








