प्रतिनिधी / फोंडा :
तामसुली, बेतकी-खांडोळा येथील प्रगतशिल शेतकरी कालिदास आत्माराम सावईकर (80) यांचे बुधवार 5 रोजी उशिरा रात्री निधन झाले. दक्षिण गोव्याचे माजी खासदार व एनआरआय आयुक्त ऍड. नरेंद्र सावईकर यांचे ते चुलते होत. कालिदास सावईकर हे कृषी व सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही सक्रीय होते.
बेतकी खांडोळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, गोवा बागायतदार संस्थेचे माजी अध्यक्ष तसेच गोवा राज्य सहकारी बँकवर प्रशासक म्हणून काही काळ त्यांनी कार्यभार सांभाळला होता. सहकार भारती गोवा प्रदेशचे ते संस्थापक अध्यक्षही होते. त्यांच्यापश्चात पत्नी मंगला, पुत्र डॉ. सिद्धार्थ सावईकर, अभिजित सावईकर तसेच स्नुषा, नातवंडे असा परिवार आहे. कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर, शिरोडय़ाचे आमदार सुभाष शिरोडकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, दत्ता खोलकर, भाजपाचे अन्य पदाधिकारी व इतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्ययात्रेला उपस्थिती लावली होती. काल गुरुवारी दुपारी तामसुली येथील स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.