प्रतिनिधी/ सातारा
कृष्णा सिंचन विभागातील कार्यकारी अभियंता प्रकाश दत्तात्रय जाधव वर अजून वरिष्ठ दफ्तर कारकून असलेल्या सहकारी महिलेने विनयभंग तसेच ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल आहे. कार्यकारी अभियंत्यावर अशा प्रकाराचा गुन्हा दाखल झाल्याने पाटबंधारे खात्यात खळबळ उडाली असून याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात पीडित महिलेने तक्रार दिली आहे.
याबाबत पीडीत महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षापासून कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव हा संबंधित महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे शब्द वापरुन हाताला घाणेरडय़ा पद्धतीने स्पर्श करीत होता. तसेच याबाबत बाहेर कोठेही वाच्यता केल्यास गोपनीय अहवालावर शेरा मारण्याची धमकी देत होता.
वेळावेळी हा प्रकार जाधव करीत असल्याने यापूर्वी संबंधित महिलेने त्यांची तक्रार वरिष्ठांकडे केली होती. त्यानुसार वरिष्ठांनी जाधवला सक्तीच्या रजेवर पाठविले होते. दरम्यान, 29 जून रोजी जाधव हा सक्तीच्या रजेवरुन पुन्हा कामावर हजर झाला. त्यावेळी त्याने संबंधित महिलेला बोलावून मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच माझी वरपर्यंत राजकीय पोहोच आहे. त्यामुळे तुम्ही माझे काहीही बिघडवू शकत नाही, असा दमही संबंधित महिलेला दिले.
सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून संबंधित महिलेने प्रकाश दत्तात्रय जाधव विरोधात दि. 4 रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात विनयभंग व ऍट्रोसिटीची तक्रार दिली आहे. वरिष्ठ अधिकाऱयांकडून महिलांना मिळणारी ही वागणूक गंभीर असून या गुन्हय़ाचा तपास तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे दिला आहे.
एका आठवडय़ातच जाधववर दोन गुन्हे
सातारा जिह्यातील एका आमदाराच्या भावाच्या जिवावर मिजास मारणारा कार्यकारी अभियंता जाधव याच्यावर त्याच्याच कार्यालयातील दोन महिलांनी विनयभंगासह एकीने ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल केल्याने जाधवचा पाय अधिक खोलात गेला आहे. सावित्रीबाई फुलेंचा वारसा असणाऱया सातारा जिह्यात मस्ती फार काळ टिकत नाही, हे पुन्हा सिद्ध झाले आहे.









