वार्ताहर /बैलहोंगल

कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा देवस्थानात शुक्रवारी कार्तिकी पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. शुक्रवारी देवीच्या दर्शनासाठी सकाळपासून डोंगरावर भाविकांनी एकच गर्दी केली होती. बेळगाव जिल्हय़ातील व परराज्यातील विविध ठिकाणाहून भाविक बस व खासगी वाहनातून हजेरी लावल्याने डोंगर फुलून गेला होता. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जोगूळभावी पुंडात भाविकांनी स्नानासाठी एकच गर्दी केली होती. पावसाची तमा न बाळगता भाविक दर्शनासाठी रांगेत उभे होते.
शुक्रवारी कार्तिकी पौर्णिमेनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रेणुका देवीची विविध रुपात आरास करून विशेष पूजा बांधण्यात आली आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून डोंगरावर सौंदत्ती पोलिसांतर्फे बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.









