प्रतिनिधी / कारवार
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीदरबारी छेडण्यात येणाऱया आंदोलनाला समर्थन देण्यासाठी वेगवेगळ्या संघटनांकडून आज जिल्हय़ातील वेगवेगळ्या राष्ट्रीय हमरस्त्यावर पुकारलेल्या ‘चक्काजाम’ आंदोलनाला अल्पप्रतिसाद मिळाला.
जिल्हय़ात राष्ट्रीय हमरस्ता क्र. 4 ए (रामनगर, पणजी) राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 63 (हुबळी, अंकोला) राष्ट्रीय हमरस्ता क्रं. 66 (कारवार, मंगळूर) सह अन्य ही राष्ट्रीय हमरस्ते आहेत. तथापि राष्ट्रीय हमरस्ता क्रं. 66 व्यतिरिक्त अन्य कुठेही रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले नाही. कारवार, मंगळूर राष्ट्रीय हमरस्त्यावर (क्रं. 66) होन्नावर तालुक्यातील अप्सरकोंड फाटय़ावर सुमारे एक तास रास्तारोको आंदोलन छेडण्यात आले.
कारवार जिल्हा कर्नाटक प्रांत रयत संघ समिती आणि सीआयटीयु जिल्हा समितीच्या संयुक्त संघर्ष समितीतून छेडण्यात आलेल्या आंदोलनात कर्नाटक प्रांत रयत संघाचे आणि सीआयटीयुची कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी केंद्र सरकारच्या जुलमी धोरणाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. रास्ता रोको आंदोलनामुळे कारवार, मंगळूर रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली आहे. रास्ता रोकोच्यावेळी कोणत्याही प्रकारचे अप्रिय घटना घडू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आंदोलनास्थळी बोलताना कर्नाटक प्रांत रयत संघाचे जिल्हाध्यक्ष शांताराम नायक म्हणाले, दिल्ली येथे कृषी कायद्यांच्या विरोधात छेडण्यात येणाऱया आंदोलनातील शेतकऱयांवर केंद्र सरकार फार मोठा अन्याय करीत आहे. केंद्र सरकार कार्पोरेट कंपन्यांचे हात बाहुले बनून राहिले आहे. शेतकऱयांच्या समस्या जाणून घेण्याचे सौजन्यही सरकारने दाखविले नाही.









