प्रशासकीय, पोलीस यंत्रणा सज्ज : सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी चारपर्यंत मतदान, जिल्हय़ात एकूण 238 मतदान केंद्रांची उभारणी
प्रतिनिधी / कारवार
जिल्हय़ातील विधानपरिषदेच्या एकमेव जागेसाठी आज दि. 10 रोजी होणाऱया मतदानासाठी प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिली आहे. भाजपचे गणपती उळवेकर, काँग्रेसचे भीमण्णा नाईक यांच्यासह पाच उमेदवार निवडणुकीच्या आखाडय़ात उतरले आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार मतदानावेळी योग्य ती दक्षता घेतली जाणार आहे. जिल्हय़ातील 227 ग्रामपंचायतीचे आणि 11 स्थानिक संस्थांचे एकूण दोन हजार 914 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये एक हजार 380 पुरुष आणि 1 हजार 534 महिला मतदारांचा समावेश आहे. जिल्हय़ात एकूण 238 मतदान केंद्रांची उभारणी केली आहे. यापैकी 28 मतदान केंदे संवेदनशील आणि 210 मतदान केंदे सामान्य स्वरुपाची आहेत. कोणत्याही मतदान केंद्रावर अप्रिय घटना घडू नये म्हणून सर्व 238 मतदान केंद्रांवर फोटोग्राफरांची व्यवस्था करून व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे. आचारसंहितेचे मतदानावेळी उल्लंघन होणार नाही, हे पाहण्यासाठी जिल्हा स्तरावर एमसीसी, एमसीएमसी, सिंगल विंडो कमिटी, डिस्ट्रीक्ट कंट्रोल रुमची स्थापना केली आहे. त्याचप्रमाणे तालुका स्तरावर एफ.एस.टी. व्ही.एस.टी. एम.सी.सी. सिंगल विंडो कमिटी तालुका नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हय़ातील एकूण 238 मतदान केंद्रावर 263 प्रिसाइडिंग ऑफिसर, 263 पोलिंग ऑफिसर आणि 36 सेक्टर अधिकाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त 261 मायक्रो निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदानासाठी 238 मतपेटय़ांची व्यवस्था करण्यात आली असून 36 मतपेटय़ा आणीबाणीच्या वेळी वापरण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हय़ातील तहसीलदार कार्यालयात मस्टरिंग आणि डिमस्टरिंग केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. तथापि, सिद्धापूर येथे मात्र मस्टरिंग आणि डिमस्टरिंग केंद्राची उभारणी माध्यमिक शाळेत करण्यात आली आहे.
अशी आहे पोलीस यंत्रणा
जिल्हय़ातील सर्व बारा तालुक्मयांमध्ये मतदान शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस कॉन्स्टेबल आणि एक हेड पोलीस कॉन्स्टेबलची नेमणूक करण्यात आली आहे. वेगवेगळय़ा कारणासाठी संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱया भटकळ तालुक्मयात के. एस. आर. पी. च्या एका तुकडीची व्यवस्था करण्यात आली आहे. अन्य तालुक्मयात एक स्ट्रायकिंग फोर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हय़ातील चार विभागात चार डीवायएसपी नेतृत्वाखाली तालुकानिहाय 16 सीपीआय/पीएसआय, 31 पोलीस निरीक्षक, 14 साहाय्यक उपनिरीक्षक, 312 पोलीस कर्मचारी आणि 14 डीएआर पोलीस कर्मचाऱयांची बंदोबस्तासाठी नेमणूक करण्यात आली आहे.
निरक्षर मतदारांची संख्या 9 साहाय्यकांची व्यवस्था
जिल्हय़ातील निरक्षर मतदारांची संख्या नऊ इतकी आहे. या मतदारांनी मतदानाच्यावेळी आपल्याला साहाय्यकांची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. त्यानुसार निरक्षर मतदारांसाठी नऊ साहाय्यकांची व्यवस्था करण्यात आली आहे.









