दोन मुली गंभीर जखमी दोघींवर गोमेकॉत उपचार
प्रतिनिधी/ कारवार, मडगाव
कारवार जिल्हय़ातील राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वर झालेल्या दोन भीषण अपघातात गोव्यातील पती-पत्नी जागीच ठार झाले. मूळ कुमटा येथील हे दांपत्त्य गोव्यातील ओर्ली गावात स्थायिक झाले होते. ही दुर्घटना काल सोमवारी दुपारी घडली. नाईक दांपत्त्याच्या जखमी असलेल्या मुलींना कारवारहून आणून बांबोळी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
कुमठा येथून गोव्याकडे निघालेल्या कार आणि कारवारहून अंकोलाकडे निघालेल्या टिप्पर यांच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात दोघेजण जागीच ठार झाले, तर दोन अल्पवयीन मुली गंभीर जखमी झाल्या. हा अपघात सोमवारी दुपारी कारवार चंडियाजवळ राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वर घडला.
मडगावातील दांपत्त्य जागीच ठार
या अपघातात विष्णू नाईक (वय 51) आणि त्यांची पत्नी विद्या नाईक (वय 45) जागीच ठार झाले. दांपत्याच्या दोन अल्पवयीन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. एका मुलीचे नाव सानवी असे समजले असून अन्य एका मुलीचे नाव समजू शकले नाही. जखमींना कारवारहून आणून बांबोळी येथे गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
नाईक हे कुटुंब मूळचे कुमठा येथील
नाईक हे कुटुंब मूळचे कुमठा तालुक्यातील असून सद्या मडगाव येथे वास्तव्य करून होते. जखमी मुलीवर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी गोव्यातील गोमेकॉ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात कारचा चेंदामेंदा झाला आहे. अपघातामुळे राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, कारवार ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत.
नादुरुस्त होऊन थांबलेल्या बसला ट्रकची ठोकर
दरम्यान, अन्य एका अपघातात नादुरुस्त झाल्याने रस्त्यावर थांबलेल्या केएसआरटीसी बसला ट्रकने पाठिमागून ठोकरल्याने चार व्यक्ती जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी कुमठा तालुक्यातील बर्गी येथे घडली. जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जखमीमध्ये आशा कार्यकर्त्यांचा समावेश आहे. जखमीमध्ये दोन आशा कार्यकर्त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.









