प्रतिनिधी/ इस्लामपूर
पुणे-बंगलोर आशियायी मार्गावर वाघवाडी फाटा येथील बॉम्बे रेऑन समोर कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात सातारा जिल्हयातील अंगापूरचे ८० वर्षीय वृध्दा जागीच ठार झाली. तर पाच जण जखमी झाले. एकाच कुटुंबातील हे सर्व जण जोतिबाचे दर्शन घेवून गावी परत जात असताना मंगळवारी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
कलाबती नारायण कणसे (८०), असे मृत वृध्देचे नाव आहे. नारायण कणसे(८०), शुभांगी कणसे(५७), सोनाली कणसे(२७), दिव्या कणसे(६), शिवम कणसे(३), अशी जखमींची नावे आहेत. हे कणसे कुटुंबिय मंगळवारी सकाळी एमएच १२ सी.वाय.२७१९ मधून जोतिबा दर्शनाला गेले होते. ते सायंकाळी गावाकडे चालले होते. दरम्यान वाघवाडी फाट्याजवळ भरधाव वेगात कारचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचा ताबा सुटून ही कार रोड दुभाजकावर जावून आदळली. यामध्ये कलावती या गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाल्या. परिसरातील लोकांनी जखमींना उपचारासाठी हलवले. याप्रकरणी विनायक सुभाष कणसे यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे.