कुर्ली फाटय़ानजीकची घटना : तिघे जण गंभीर : अपघातग्रस्त सर्वजण सांगली येथील
प्रतिनिधी / निपाणी

कार अपघातात मायलेकी जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी 7.30 च्या सुमारास कुर्ली फाटय़ानजीक घडली. या अपघातात कारमधील लता राजेंद्र पाटील (वय 38) व अनिषा राजेंद्र पाटील (वय 16, रा. बिसूर, ता. मिरज, जि. सांगली) अशी जागीच ठार झालेल्या मायलेकींची नावे आहेत. अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत.

कार (क्र. केए 03 एनडी 5161) ही घेऊन राजेंद्र पाटील सांगलीहून बेंगळूरकडे जात होते. महामार्गावर कुर्ली फाटय़ानजीक आल्यानंतर राजेंद्र पाटील यांचे कारवरील नियंत्रण सुटून कार झाडाला धडक देऊन उलटली. कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. कारमध्ये सर्वजणच अडकून पडले होते.
कारमधील लता पाटील व अनिषा पाटील या मायलेकींचा जागीच मृत्यू झाला. कारचालक राजेंद्र पाटील (वय 44), अथर्व राजेंद्र पाटील (वय 14), सुमित संजय पाटील (वय 19) हे तिघे गंभीर जखमी झाले. या तिघांना म. गांधी हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजेंद्र पाटील हे बेंगळूर येथे भारतीय सैन्यामध्ये कार्यरत आहेत. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्थानकाचे फौजदार बी.एस. तळवार, एएसआय आर.आय. कम्मार, हवालदार प्रकाश सावजी, संजय काडगौडर, रायाप्पा मुदपाकी यांच्यासह जयहिंद कंपनीच्या कर्मचाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुपारनंतर मृतदेह विच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.









