रामराजे व पालकमंत्र्यांच्या जि.प. अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी/ सातारा
दोन आठवडय़ापूर्वीच राष्ट्रवादीच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांची व पदाधिकाऱयांची बैठक जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी घेण्यात आली होती. त्या बैठकीत जिल्हा परिषदेतील तक्रारींचा पाढाच सदस्यांनी पदाधिकाऱयांच्यासमोर मांडला होता. तत्पूर्वी जिल्हा परिषदेने राज्यात पंचायत राज सशक्तीकरणमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल अधिकाऱयांचे कौतुक केले अन् नंतरच्या बैठकीत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांनी कामे वेळेवर आणि दर्जेदार करावीत, अशा सूचना दिल्या.
विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्यावतीने झेडपीच्या अधिकाऱयांची बैठक शासकीय विश्रामगृहात दुपारी बोलवली होती. या बैठकीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अविनाश फडतरे, किरण सायमोते, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, समाजकल्याणचे अधिकारी नितीन उबाळे, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, बांधकामचे अभियंता अभय पेशवे, भोसले आदी सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, झेडपीच्या माध्यमातून जी कामे सध्या सुरु आहेत. ती कामे चांगल्या दर्जाची झाली पाहिजेत. कुठेही कामाचा दर्जा ढासळता कामा नये. माझ्याकडे अनेक तक्रारी होत आहेत. सातारा जिह्यातील सर्वच कामे चांगली आणि लवकरात लवकर झाली पाहिजेत. कोणतीही अडचण आल्यास मी तुमच्या पाठीशी आहे. येत्या काही महिन्यात निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्याचअनुषंगाने आचारसंहिता लागेल तत्पूर्वीच असलेला फंड, निधी खर्च करुन लोकांची कामे करा, अशा सूचना देण्यात आल्या. प्रत्येक विभागाचा आढावाही त्यांनी घेतला.
तुमचं बरं हाय
आमदार मकरंद आबा हे बैठक उरकून महाबळेश्वरला चालले असताना दीपक चव्हाण हे तेथेच होते. त्यांना म्हणाले, महाबळेश्वर निघालात तुमचं बरं हाय, असे म्हणताच आबा म्हणाले, येताय का गाडीतून दाखवतो मतदार संघ. तुम्हाला काय सभापतीसाहेबांचा आर्शीवाद आहे. ते काही कमी पडू देत नाहीत. आम्हाला येथे तीन तालुके बघायला लागतात. सभापती साहेब करतात सगळी तुम्ही आमदार निवांत असे म्हणताच पालकमंत्री बाळासाहेब पोहचले अन् आबांना म्हणाले, शिवथरला चाललो आहे किरण साबळे- पाटील यांच्या घरी. तेव्हा आबाही म्हणाले, मीही तिकडेच चाललो आहे. असे म्हणून दोघेही किरण साबळे पाटील यांच्या निवासस्थानी त्यांचे सांत्वंन करण्यास गेले.








