यशवंत भोसलेंचा राज्य व केंद्र सरकारवर घाणाघात
प्रतिनिधी / सातारा :
शेतमालाला हमी भाव नाही. कामगारांच्या बाजूने कायदे असले तरी कामगारांना कोणीही वाली उरला नाही. आज कामगार टिकला पाहिजे, कामगार वाचला पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे, अशा शब्दात राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधत कामगार नेते यशवंत भोसले यांनी आम्ही कामगारांचे आईपण आहोत आणि बापपण आहोत, असा दावाही केला. दरम्यान, जातीय मोर्चे काढणाऱ्यांनी स्थानिक भूमीपूत्रांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी लढा उभारावा, असे आवाहन केले.
साताऱ्यातील शासकीय विश्रागृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेपूर्वी त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांची भेट घेतली. आमदार शिंदे यांच्या भेटीवेळी ते म्हणाले, राष्ट्रीय समिती ही माझी स्वतंत्र संघटना आहे. गेली 31 वर्ष मी या चळवळीत काम करतो आहे. शिंदे देखील कामगार चळवळीत आहेत. कामगारांच्या काय व्यथा आहेत काय दुख आहेत. हे आमच्या दोघांएवढे कोणाला माहिती नाही. कारण त्यांचे आम्ही आईपण आहोत आणि बापपण आहोत. सर्वसामान्य कामगारांना कोणी वाली राहिला नाही, अशी परिस्थिती आहे. त्यावर आमची चर्चा झाली. ठेकेदार, गुंड यांना उद्योगपती जवळ करतात. त्यांना पोसतात. तिथं मात्र पोलिसांचे लक्ष जात नाही. परंतु अन्यायग्रस्त कामगारांना न्याय मागायला गेले की व्हाईटकॉलर गुंडाचा वापर काही उद्योगपती करतात. तिथे मात्र जो नेता जाईल त्याला लगेच गुन्हेगारांच्या यादीत बसवल जाते. ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे.