खानापूर तालुक्यात कामगार कार्डधारक 10 हजार, रेशन कीट 2500 : किट मिळवण्यासाठी अनेकांची गर्दी, कामगारांचे आंदोलन
वार्ताहर /खानापूर
कोरोनाच्या गंभीर परिस्थितीच्या काळात अनेक कामगार रोजगाराअभावी घरीच बसून राहिले. अनेकांवर उपासमारीची वेळ आली. राज्य सरकारने देखील कामगार आयुक्तालयाच्या माध्यमातून अधिकृत नोंदणी झालेल्या कामगारांना रेशन किट्स देऊ केले. खानापूर तालुक्मयात तब्बल दहा हजारांहून अधिक नोंदणीकृत कामगार असतानाही कामगार आयुक्तालयामार्फत केवळ 2500 किट्स देऊन नाकावर लोणी पुसण्याचा प्रकार संबंधित विभागाने केल्याने संतप्त कामगारांनी शुक्रवारी ता. पं. तसेच तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून निषेध नोंदविला.
खानापूर तालुक्मयात कामगार खात्याकडून आमदार डॉ. निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली 2500 किट्स दोन दिवसापूर्वी वितरीत करण्यात आले. पण अनेकांना सदर किट्स मिळाले नाहीत. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून रेशन किट्स मिळवण्यासाठी ता. पं. व तहसीलदार कार्यालयासमोर अनेक कामगारांनी एकच गर्दी केली. शुक्रवारीदेखील जवळपास तीनशेहून अधिक कामगार किट्स मिळवण्यासाठी ता. पं. कार्यालयसमोर उपस्थित होते. परंतु किट्स देण्यासाठी कोणी अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी उपस्थित नसल्याने संतप्त कामगारांनी ता. पं.ला घेराव घातला. पण त्याठिकाणीही त्यांना न्याय मिळाला नसल्याने तहसीलदारांकडे जाऊन दाद मागितली. थहसीलदारांनीही त्यांना समर्पक उत्तर न देता दिशाभूल करून ता. पं.कडे जाण्यास सांगितले. पण सायंकाळी उशिरापर्यंतही कोणीच आले नसल्याने संतप्त कामगारांनी महामार्गावर रास्तारोको करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांनी या कामगारांचे म्हणणे ऐकून घेऊन ता. पं. रस्त्यावरील पोलीस स्थानकाच्या बाजूला थांबण्यास सांगितले व त्याच ठिकाणी त्या कामगारांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. पण त्या कामगारांचे म्हणणे ऐकण्यासाठी कोणीच आले नसल्याने कामगारांनी निषेध नोंदविला.
कार्मिक खात्याच्या वतीने जे कुली कामगार तसेच रोजंदारीवर काम करणारे कामगार आहेत. अशांसाठी कामगार कार्ड देण्यात आले आहेत. शासनाच्या अनेक सुविधा या कार्डवरून मिळवून दिल्या जात आहेत. खानापूर तालुक्मयामध्ये जवळपास 10 हजारहून अधिक कामगार कार्डधारक आहेत. पण केवळ 2500 किट्स आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली ता. पं. आवारात वितरित करण्यात आले. पण याप्रसंगी तालुक्मयातील सर्व कार्डधारकांना निमंत्रित करण्यात आले नाही. केवळ मर्जीतील लोकांना वितरण कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आल्याचा आरोप महिलांनी करत आक्रोश व्यक्त केला. कामगार आयुक्तालयाच्या माध्यमातून प्रत्येक कार्मिक कार्डधारकाला सदर किट्स वितरित करण्यासाठी कार्मिक खात्याने योजना राबवली असली तरी तालुक्मयात केवळ 2500 रेशन किट्स पाठविण्यात आल्याने अनेकजण किट्सपासून वंचित राहिले आहेत.
यासंदर्भात बैलहोंगल विभागीय कामगार निरीक्षक बेटगेरी यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दूरध्वनी घेतला नाही. शिवाय ते परस्पर बैलहोंगलला गेल्याने संतप्त कामगारांनी तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यावेळी तहसिलदार रेश्मा तालिकोटी यांनी बैलहोगल विभागीय लेबर निरीक्षकांशी संपर्क साधून विचारणा केली असता उर्वरित कार्डधारकांसाठी सरकारकडे मागणी केली आहे. पण जेव्हा मिळेल तेव्हा त्यांना ते उपलब्ध करून देता येईल. सध्या 2500 किट्स होते. ते वाटण्यात आले आहे आहेत. पण उर्वरित कामगारांवर अन्याय झाल्याचा आरोप करत त्या कार्डधारकांना माघारी परतावे लागले.
लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष…
सायंकाळी उशिरापर्यंत अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी कोणीही आले नसल्याने पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांनी दोन दिवसात संबंधित अधिकाऱयांना बोलावून तालुक्मयातील सर्व कामगारांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. वास्तविक तालुक्मयात 10000 हून अधिक नोंदणीकृत कामगार असताना राज्य कार्मिक खात्याकडून खानापूर तालुक्मयासाठी केवळ 2500 कीट देण्यात आले आहेत. शेवटी पोलिसांनाच कामगारांना शांत करून माघारी जाण्यास भाग पाडले. तरीही गोरगरिबांना किट्स मिळालेच पाहिजेत, असा ठाम निर्णय राजू कांबळे या सामाजिक कार्यकर्त्याने घेतला. त्यावर अधिकाऱयांनी दोन दिवसाची मुदत घेतली आहे.









