प्रतिनिधी / काणकोण
माजी आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर यांनी काणकोण तालुक्यातील गणेशभक्तांना माटोळीचे साहित्य एकत्र मिळावे यासाठी सुरू केलेल्या उपक्रमात यंदा कोरोना महामारीमुळे खंड पडतो की काय असा प्रश्न निर्माण झाला असून यासंबंधी सकारात्मकरीत्या विचार करण्याची तयारी काणकोणचे उपजिल्हाधिकारी सतीश प्रभू यांनी दाखविली आहे.
काणकोण पालिकेच्या सहकार्याने चावडीवरील कदंब बसस्थानकासमोरच्या मोकळय़ा जागेत मागच्या सात-आठ वर्षांपासून ही फेरी भरत आली असून माटोळीला लागणारी विविध रानटी फळे, फळ-भाज्या, आंब्याची पाने, माटोळीला बांधायला लागणारे अन्य साहित्य या ठिकाणी एकत्र मिळायला लागल्यामुळे कामधंद्यानिमित्त गावाबाहेर असलेल्या स्थानिक गणेशभक्तांची बऱयापैकी सोय या ठिकाणी होत असे. गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी ही फेरी या ठिकाणी भरविण्यात येत असे. मात्र कोरोना महामारीमुळे सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवून आणि गर्दी कमी करून माटोळीचे साहित्य या ठिकाणी उपलब्ध करून देणे शक्य आहे की काय यावर विचार केला जाईल, असे उपजिल्हाधिकारी प्रभू यांनी स्पष्ट केले आहे.









