प्रतिनिधी / काणकोण
काणकोणचे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व अनंत सावंत (वय 67 वर्षे) यांचे 6 रोजी निधन झाले. त्याचदिवशी सावंतवाडा येथील त्यांच्या मूळ निवासस्थानाजवळ त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली व अन्य असा परिवार आहे.
एक उत्तम शिक्षक आणि गणित विषयाचे अध्यापक असलेल्या स्व. सावंत यांनी कुंकळ्ळी तसेच फोंडा येथील उच्च माध्यमिक विद्यालयांत विद्यार्जन केले. कुंकळ्ळी आणि फोंडा या भागांमध्ये त्यांचे असंख्या विद्यार्थी आहेत. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून नाव मिळविलेले असताना अकस्मात त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी विमा एजंट म्हणून काम करतानाच काही काळ काणकोणच्या 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयाचे शिकवणी वर्ग सुरू केले.
काणकोण जेसी, साफल्य अर्बन पतसंस्था तसेच चार रस्ता येथील सेंत्रु प्रोमोतोर द इस्त्रुसांव या शैक्षणिक संस्थेसाठी योगदान देतानाच काणकोणच्या अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. ते स्वतः एक उत्तम खेळाडू तसेच आयोजक होते. 1989 साली झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत त्यांनी काणकोण मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केली होती आणि त्यानंतर त्यातून माघार घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षासाठी त्यांनी काम केले. माजी मंत्री रमेश तवडकर यांचे निकटवर्तीय राहिलेले सावंत त्यांचे राजकीय सल्लागारही राहिले होते.
मागच्या जवळजवळ चार-पाच वर्षांपासून एका मानसिक धक्क्यामुळे त्यांचा सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांकडील संपर्क तुटला होता. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच माजी मंत्री तवडकर, माजी आमदार विजय पै खोत यांच्यासहित राजकीय, सामाजिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. सदा हसतमुख, निगर्वी, निरपेक्ष भावनेने काम करणारी एक अजातशत्रू अशी व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली असल्याची प्रतिकिया बऱयाच जणांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर व्यक्त केली. अवघ्याच दिवसांनंतर त्यांच्या ज्येष्ठ कन्येचा लग्न सोहळा होणार होता. तो पाहण्याचे भाग्य मात्र त्यांना लाभले नाही.









