प्रतिनिधी / काणकोण
काणकोण तालुक्यात कोरोनाने रौद्र रूप धारण केले असून या तालुक्यातील एकाच घरात पाचपेक्षा अधिक रुग्ण ज्या भागात आढळले आहेत ते भाग कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या भागांमध्ये 24 तास डॉक्टर पथक ठेवण्यात आले असून रुग्णांची तपासणी केली जात आहे. त्याचबरोबर सदर भागांचे वारंवार निर्जंतुकीकरण करण्यात येत असल्याची माहिती काणकोणचे मामलेदार विमोद दलाल यांनी दिली. सध्या या तालुक्यातील होवरे, गावडोंगरी, श्रीस्थळ पंचायतीचा भाग, देळे आणि राजबाग-तारीर परिसर हे भाग कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलेत आहेत. या भागांमध्ये 10 पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱयांनी तसा आदेश काढला आहे. या सर्व ठिकाणी पोलीस पहारा ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्या ज्या व्यक्ती या भागांमध्ये जातात आणि परत येतात त्यांची नोंदणी केली जात आहे. जे भाग कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर झालेले आहेत तेथील लोकांपासून अन्य भागांतील लोकांना संसर्ग होणार नाही याची दक्षता या ठिकाणी घेतली जात आहे.









