प्रतिनिधी / काणकोण
मागच्या चार दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे काणकोणच्या चापोली धरणाचा जलाशय पूर्ण भरून वाहू लागला आहे. या जलाशयातील पाण्याने पातळी ओलांडली आहे. सदर जलाशयातील पाण्याची पातळी 38.75 मी. इतकी असून मागच्या वर्षी हे धरण 15 जुलै रोजी पूर्ण भरले होते, अशी माहिती या धरणाचा ताबा असलेल्या काणकोणच्या जलस्त्रोत खात्याच्या कनिष्ठ अभियंत्या कल्पना गावकर यांनी दिली.
या तालुक्यातील लोकांची पिण्याची पाण्याची गरज भागविणारे चापोली धरण हे पर्यटकांचे एक आकर्षण बनलेले असून दरवर्षी पावसाळय़ात त्याची मजा लुटण्यासाठी लोकांची गर्दी होत असे. मात्र मागच्या वर्षी या ठिकाणी जे अश्लील व्हिडीओचे चित्रीकरण झाले त्यानंतर या धरणावर जायला सर्वांनाच बंदी घालण्यात आली असून या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर हे धरण अवलंबून असून सध्या त्याचा जलाशय तुडुंब भरून वाहू लागला आहे. याला येथील एक नागरिक समीर नाईक यांनी पुष्टी दिली.









