अन्यथा तीव्र आंदोलन : गोवा फॉरवर्डचा इशारा
प्रतिनिधी/ काणकोण
काणकोण तालुक्यात सध्या जी पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे ती अत्यंत चिंतेची आणि शरमेची बाब असून मतदारसंघाच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगून पक्षांतर केलेल्या उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांना या गोष्टी दिसत नाहीत काय, असा सवाल गोवा फॉरवर्डच्या प्रशांत नाईक यांनी केला आहे. भाजपाने दिवाळी सणाच्या वेळी पोहे आणि गूळ देतानाच पिण्याच्या बाटल्या द्यायला हव्या होत्या, असे ते म्हणाले. 19 डिसेंबरपर्यंत जर काणकोणचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही, तर गोवा फॉरवर्ड पक्ष तीव्र आंदोलन करणार असा इशारा त्यांनी काणकोण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
या तालुक्यातील चावडी, किंदळेबाग, गावडोंगरी, पैंगीण, लोलये या परिसरांत आठ-आठ दिवस पाणी पोहोचत नाही. जनतेने स्वखर्चाने उभारलेले नळ दिवसभर कोरडेच असतात, याबद्दल नाईक यांनी नाराजी व्यक्त केली. भाजप सध्या सर्वच बाबतीत जनतेची मस्करी करायला लागला आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच काणकोण तालुक्यातील शेतकऱयांचे भवितव्य ज्या बंधाऱयांच्या पाण्यावर अवलंबून आहे ते बंधारे अजूनही उभारले जात नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
मतदारांनी जाब विचारावा
गोव्यात म्हादई, कोळसा, दुपदरीकरण, बेरोजगारीसारखे प्रश्न धगधगत असताना गोवा सरकार गोवा मुक्तीच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त कोटय़वधी रुपयांचा चुराडा करायला निघाले आहे. यासंबंधीचा जाब मतदारांनी जिल्हा पंचायत निवडणुकीकरिता मते मागायला येणाऱया भाजपाच्या कार्यकर्त्यांना विचारायला हवा, असे मत नाईक यांनी व्यक्त केले. गोवा मुक्तीच्या वर्धापनदिनी ध्वजारोहण करूया, स्वातंत्र्यसैनिकांचा गौरव करूया. त्याचबरोबर सुरक्षा रक्षक, कला आणि संस्कृती खात्यामार्फत चालविण्यात येणाऱया वाचनालयांतील कर्मचारी, बालरथांचे कर्मचारी यांचे मानधन वाढवा, असा सल्ला त्यांनी दिला. सध्या गोव्यातील जनता भाजपाच्या कार्यप्रणालीवर नाराज आहे. गोव्याचे मतदार प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याच्या तयारीत आहेत. जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीतून जनता आपला राग दाखवून देईल, असे नाईक पुढे म्हणाले.