प्रतिनिधी / काणकोण
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि संचारबंदी जाहीर केल्यानंतर नागरिकांनी एकच धसका घेतला असून 9 रोजी काणकोण तालुक्यातील पैंगीण, भाटपाल, चावडी, चार रस्ता येथील बाजारपेठेतील किराणामालाची दुकाने, भाजीपाल्याची काही दुकाने खुली होती. पैंगीण, मोखर्ड येथील स्वस्त धान्याच्या दुकानांतील लोकांची काही प्रमाणात असलेली गर्दी सोडल्यास लोकांनी घरातून बाहेर न पडणे पसंत केल्यामुळे नेहमीची गर्दी या ठिकाणी दिसली नाही. चावडीवरील पै खोत एंटरप्रायझेस आस्थापनासमोर एरव्ही नेहमीच गर्दी दिसायची. परंतु रविवार असूनही या आस्थापनासमोर तुरळक लोक दिसत होते.
काणकोण तालुक्यातील अर्धेअधिक लोक कारवार, माजाळी येथून येणाऱया मासळीवर अवलंबून असतात. कारवार प्रांतातून बसवाहतूक बंद झाल्यानंतर या भागातील मासे वाहतूक काही प्रमाणात बंद झाली होती. कदंबच्या बसेस पोळे चेकनाक्यापर्यंत जाऊन यायला लागल्यानंतर माजाळी, कारवार या भागांतून मासे काणकोण तालुक्यात यायला लागले. या तालुक्यातील माशे, अर्धफोंड, भाटपाल, वडामळ, शेळेर, चावडी या ठिकाणी बसून या मासेविक्रत्या महिला मासेविक्री करत आलेल्या आहेत. रविवारी या महिलांना मासे परत घेऊन जावे लागले. बऱयाच दिवसांपासून बंद असलेल्या चावडीवरील मासळी मार्केटमध्ये काही महिला विक्रेत्या मासेविक्रीसाठी आल्या होत्या. परंतु लोकांनी मार्केटकडे पाठ फिरविल्यामुळे त्यांच्या विक्रीवरही परिणाम झाला. भाजीपाल्याची दुकाने देखील ओस पडलेली दिसत होती. रविवारी तालुक्यातील काही व्यापारी आपली आस्थापने खुली ठेवतात. परंतु कर्फ्यूमुळे ही आस्थापने पूर्ण बंद ठेवण्यात आली होती. एक-दोन वाईन शॉप खुली होती, तर हॉटेलमधून ‘टेक अवे’ची व्यवस्था करण्यात आली होती. चावडी, चार रस्ता या भागांमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काणकोणचे नगराध्यक्ष सायमन रिबेलो यांनी काणकोण पालिका क्षेत्राबरोबरच काणकोणच्या सर्व पंचायत क्षेत्रांतील नागरिकांच्या भल्यासाठी कोणीही घरातून विनाकारण रस्त्यावर येऊन गर्दी करू नये, आवाहन केले आहे. आपल्या वॉर्डात गरज भासल्यास आपले स्वयंसेवक 24 तास सहकार्यासाठी तत्पर असतील, असे त्यांनी कळविले आहे. उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनीही काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, परिचारिका, काणकोणचे उपजिल्हाधिकारी, मामलेदार, पोलीस कर्मचाऱयांना सहकार्य करण्यग्नाचे आवाहन केले आहे. ही साखळी तोडण्यासाठी थोडी कळ सोसा असे आवाहन करतानाच सकाळच्या सत्रात जीवनावश्यक वस्तूंसाठी जेव्हा दुकाने उघडली जातील त्यावेळी गर्दी न करता आवश्यकता भासली, तरच बाहेर पडा असे त्यांनी सूचित केले आहे.









