प्रतिनिधी /म्हापसा
मोटार सायकल, फेसिनो स्कुटरवरून हेल्मेट परिधान करून महिलांच्या गळय़ातील मंगळसूत्र हिस्कावून पळ काढणाऱया सराईत चोरटय़ास कोलवाळ पोलिसांनी काणका येथून अटक केली आहे. रोहन रतिकांत कोरगावकर खलपवाडा, काणका, असे या संशयिताचे नाव आहे.
बार्देश, पेडणे, डिचोली आदी तालुक्यातील चोरी प्रकरणात त्याचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यादिशेन तपास सुरू आहे. 14 जानेवारी रोजी अनिता दत्ता नाईक(वरचावाडा, चिखली) या सायं 4 वा. कोलवाळच्या दिशेने जाताना संशयित रोहन याने जीए-03 एएच 2521 या दुचाकीने आला व अनिता नाईक यांच्या गळय़ातील मंगळसूत्र हिस्कावून पळ काढला. याची किंमत बाजारपेठेत 1 लाख रुपये आहे. दरम्यान सीसीटीव्ही कॅमेराद्वारे पोलिसांनी नंबरवरून सुरेश कुंभार या गाडीच्या मालकास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता रोहनला ही दुचाकी भाडय़ाने दिली असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याला गाठून कारवाई केली. संशयिताने चोरीची कबुली दिली आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मंदार नाईक यांच्या नेतृत्वाखाली सुरेश नाईक, संतोष नार्वेकर अनिषकुमार फडके, प्रकाश पोळेकर, अभिषेक कासार, अक्षय पाटील या पोलिस पथकाचा समावेश होता.









