प्रतिनिधी / बेळगाव
नव्याकोऱ्या बलेनो कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात एक मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला आहे. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर काकती पोलिस स्थानकाच्या नजीक नुकतीच ही घटना घडली असून या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. भारतीय लष्करी दलात सेवारत मूळचे गर्लगुंजी येथील आणि सध्या वडगाव येथे वास्तव्यास असलेले शिवराज पाटील हे आपल्या गावाकडे निघाले होते. दिल्ली येथून पुणे येथे आल्यानंतर आपल्या मित्रासमवेत कारने ते बेळगाव कडे येत होते. यावेळी अचानक गाडीचा टायर फुटल्याने गाडी दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूला गेली आणि यात समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक बसून त्याचा मृत्यू झाला आहे .घटनेची नोंद काकती पोलीस ठाण्यात झाली असून मयत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे. मयत व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस तपास सुरू आहे.









