बेळगाव परिसरातील खरेदीदारांकडून इंदोर, आग्रा बटाटय़ाची खरेदी
वार्ताहर/ अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारच्या बाजारात कांदा, बटाटा, रताळी यांचा भाव स्थिर आहे. भाजी मार्केटमध्ये कोथिंबीर दरात घट झाली असून इतर भाजीपाल्यांचे भाव मात्र स्थिर आहेत.
परराज्यातून वेफर्स (चिप्स) बनवण्यासाठी लाल जमिनीतील जवारी बटाटय़ाला अधिक मागणी आहे. बेळगाव परिसरातील खरेदीदार इंदोर, आग्रा बटाटय़ाची खरेदी करत आहेत. यामुळे स्थानिक खरेदीदार परराज्यातील बटाटा खरेदी करत असल्याने जवारी बटाटय़ाची आवक कमी असून देखील याचा दर प्रति क्विंटल स्थिर आहे.
बेळगाव रताळय़ाला परराज्यातून मागणी असते. रताळय़ांना दिल्ली, मुंबई, हरियाणा, पंजाब या ठिकाणाहून बेळगाव रताळय़ाला मागणी आहे.
कांदा भाव स्थिर
कर्नाटकातील कांदा ओला असल्यामुळे परराज्यामधून कांद्याला मागणी कमी झाली आहे. महाराष्ट्र कांद्याला गोवा, कोकण पट्टा, कारवार, बेळगावमध्ये मागणी आहे. यामुळे कांद्याचा भाव स्थिर आहे.
शनिवारच्या बाजारात कर्नाटक कांद्याची 35 ट्रक व महाराष्ट्र कांद्याची 20 ट्रक आवक होती. जवारी बटाटय़ाची दोन हजार पिशव्या व रताळय़ाची सहा हजार पिशव्या आवक होती.









