वार्ताहर / मालवण:
तालुक्यातील कांदळगावचे सुपुत्र, मुंबई पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी हेमंत नागेश राणे यांना पोलीस दलातील गुणवत्तापूर्वक सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले होते. मुंबई येथे पोलीस अधिकाऱयांच्या उपस्थितीत हेमंत राणे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले.
राणे यांच्या पोलीस दलातील गेली 34 वर्षे करीत असलेल्या सेवेतील कार्याची दखल घेऊन त्यांची राष्ट्रपती पदकासाठी निवड करण्यात आली. त्यांचे सर्वस्तरातून विशेष कौतुक होत आहे. हेमंत राणे यांनी 1 मार्च 1987 रोजी पोलीस शिपाई पदावर सेवेस प्रारंभ केला. त्यांनी अधिक काळ क्राईम ब्रँचमध्ये काम केले असून त्यांनी अनेक अंडरवर्ल्ड, गँगस्टार यांचा खात्मा केला आहे. खुनाचा प्रयत्न, दरोडा, अपहरण यासारख्या गुन्हय़ांच्या प्रकरणांचा त्यांनी उलगडा केला आहे. 2001 मध्ये तत्कालीन पोलीस महासंचालकांच्या हस्ते गौरवास्पद कार्याची दखल घेऊन गौरव केला होता. सध्या ते मुंबईतील पोलीस महासंचालकांचे कार्यालय येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावत आहेत.









