सभेसाठी निवडणूक आयोगाची मान्यता नव्हती
प्रतिनिधी /मडगाव
रूमडामळ-दवर्ली येथे काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगडी यांची जाहीर सभा शनिवारी आयोजित करण्यात आली होती. मात्र, या सभेला निवडणूक आयोगाची मान्यता नसल्याने मायणा-कुडतरी पोलिसांनी ही सभा बंद पाडली. मायणा-कुडतरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक सागर एकोस्कर यांनी व्यासपीठावर जाऊन ध्वनिक्षेपक काढून घेतला.
शनिवारी निवडणूक आयोगाने गोव्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली होती. त्यामुळे जाहीर सभा घ्यायची झाल्यास, त्याला राज्य निवडणूक आयोगाकडून मान्यता घेणे जरूरीचे होते. मात्र, या सभेसाठी तशी कोणतीच मान्यता नव्हती. तसेच कोविड महामारीच्या मार्गदर्शन तत्वाचे उल्लंघन केले जात असल्याने ही सभा बंद करणे पोलिसांना भाग पडले.
या सभेसाठी दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली होती. मात्र, शनिवारपासूनच आचारसंहिता जारी झाल्याने, पूर्वी घेण्यात आलेली मान्यता रद्दबातल ठरली होती. आयोजकांनी राज्य निवडणूक आयोगाची परवानगी घेणे बंधनकारक होते. मात्र, तशी मान्यता नसल्याने निरीक्षक सागर एकोस्कर यांनी थेट व्यासपीठावर जाऊन सभेतील ध्वनिक्षेपक ताब्यात घेतला.
सवाल आपल्या नोकरीचा
सभा घेण्यासाठी आयोजकांकडे राज्य निवडणूक आयोगाची मान्यता नसल्याने अशी सभा घेता येणार नाही. सभा रद्द करावी अशी कल्पना देण्यात आली होती. मात्र, त्याही परिस्थितीत सभा घेण्यात आली, सभा सुरू झाल्याने निरीक्षक सागर एकोस्कर प्रचंड संतप्त झाले होते. या सभा घेण्यासाठी परवानगी नाही तसेच कोविड मार्गदर्शन तत्वे पाळली जात नसल्याने निवडणूक आयोग आम्हाला घरी पाठविणार, आमच्या नोकरीचा सवाल असल्याचे सांगत निरीक्षक सागर एकोस्कर यांनी ध्वनिक्षेपक ताब्यात घेतला. यावेळी उपस्थित असलेल्या अल्यसंख्याक पदाधिकाऱयांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला व परंतु, त्यांनी दाद दिली नाही.
मुख्य वक्ते इम्रान प्रतापगडी बोलण्याच्या पूर्वीच ती बंद करण्यात आली. मात्र, नंतर ध्वनिक्षेपक नसतानाच त्यांनी उपस्थितांकडे संवाद साधताना काँग्रेस पक्षाला विजयी करण्याचे आवाहन केले. देशभरात सद्या अल्पसंख्याकाच्या विरोधात घडामोडी घडत असून भाजप सरकार हटविल्याशिवाय त्या बंद होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
आज आपल्याला जास्त बोलता येत नाही. परंतु, दुसऱयावेळी जेव्हा येऊ तेव्हा आपण अधिक सखोल बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, नावेलीत काँग्रेसच्या उमेदवारीसाठी दावा करणाऱया उमेदवाराच्या समर्थनात ही सभा घेतली होती. त्याला मात्र शेवटी उमेदवारी मिळाली नाही. नावेलीत काँग्रेस पक्षाने माजी आमदार आवेर्तान फुर्तादो यांना उमेदवार म्हणून काल रविवारी घोषणा केली.









