कोरोना महामारी मागे पडली आहे आणि त्याकाळातही कुरघोडय़ा करणारी राजकीय मंडळी आता विशेष सक्रिय झाली आहेत. महाराष्ट्रात तर कायदा-सुव्यवस्था आणि नेकीचे राजकारण उद्ध्वस्त झाले आहेत. प्रशासकीय आधिकारी वैतागले आहेत. सर्वसामान्य जनता नौटंकीबाज नेत्यांना वैतागली आहे. अशावेळी पुन्हा दोन अस्त्रs प्रमुख पक्षाकडून बाहेर निघताना दिसत आहेत. त्यामध्ये काँग्रेसने कात टाकायची व लोकसभेच्या 370 जागा स्वबळावर व महाराष्ट्र, बंगाल, पंजाब येथे मित्र पक्षासोबत लढायचे हा रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा प्रस्ताव स्वीकारलेला दिसतो आहे. काँग्रेस आणि भाजप विरोधक एकत्र येऊन 2024 च्या लोकसभेसाठी व्यूहरचना करताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या विरोधकांची एकमूठ करण्याबरोबरच काँग्रेसला सुरक्षित अंतरावर ठेवण्यासाठी हालचालीही दिसत आहेत. विरोधी आघाडीवर अशी पावले पडत असताना भाजपाने 370 कलम रद्द नंतर आता समान नागरी कायदा करण्याचे ठरवलेले दिसते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी असोत किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असोत यांची त्या दिशेने वक्तव्ये सुरु झाली आहेत. राजकीय मारामाऱया, आरोप-प्रत्यारोप, शक्ती प्रदर्शन, नौटंकी आणि यंत्रणांचा सुडाने वापर सुरुच आहे. या साऱया गोंधळात एकच आनंदवार्ता आहे. यंदा पाऊस चांगला होणार आणि देशात कुठेही दुष्काळाचे चिन्ह नाही. भारतीय जनता पक्षाचे शतप्रतिशत भाजप अभियान सुरु झाल्यावर घराणेशाहीवर राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष चालवणारे बॅकफूटवर गेले आहेत. नुकत्याच झालेल्या चार राज्याच्या निवडणुकातही त्याची प्रचिती आली आहे. केंद्रात मोदी सत्तेवर आल्यानंतर देशात काँग्रेसचा पराभवावर पराभव होत गेला. एकेकाळी देशपातळीवर सर्वत्र प्रभावी असणारी काँग्रेस हळूहळू क्षीण होत आहे. काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळेना. शरद पवार, ममता बॅनर्जी सारखे दिग्गज काँग्रेसमधून फुटून बाहेर पडलेले नेते काँग्रेसला वापरु लागले आहेत. उत्तर प्रदेश असो, बंगाल असो वा गोवा. काँग्रेसला यश व सत्ता गवसताना दिसली नाही. या पार्श्वभूमिवर आगामी राष्ट्रपतीची निवडणूक आणि 2024 च्या लोकसभा निवडणुका कशा लढवायच्या यावर पक्षात आणि मित्र पक्षात चिंतन होत होते. कोरोना आणि युद्ध यांचे अनेक गोष्टीवर परिणाम झाले आहेत. महागाई, बेरोजगारी कमालीची वाढली आहे. महाराष्ट्रात शरद पवारांनी तीन पक्ष एकत्र आणून मिळवलेली सत्ता आणि भाजप व महाआघाडी सामना यामुळे रोजचा दिवस नौटंकीचा बनला आहे. त्यातच आता राज ठाकरे यांनी ‘उतरव तो भोंगा’ अशी भूमिका घेतल्याने शिवसेना अडचणीत आली आहे. 3 मे रोजीचा अल्टीमेटम आहे. त्यानंतर राज्यात काय होईल, हे सांगता येत नाही. राज्यात आघाडी सरकार असले तरी मंत्रिमंडळातील तगडी खाती, निधी व उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. अलीकडे राज्यव्यापी नेतृत्व दृढ होणे कठीण झाले आहे. बहुतेक मंत्री मतदार संघापुरतेच दिसतात. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी परिवार संवाद यात्रा करुन महाराष्ट्र पिंजून काढला आहे. विविध जिह्यातील तगडे तरुण सोबतीला घेत पक्ष बांधणी व राज्यव्यापी नेतृत्व यामध्ये पुढचे पाऊल टाकले आहे. परिवार संवाद यात्रेची कोल्हापुरात सांगता झाली त्यावेळी जयंतराव पाटील यांनी जमवलेली गर्दी आणि इस्लामपुरची सभा त्यासाठी जमलेले श्रोते यातून राष्ट्रवादीला शक्ती मिळालेली आहे. नवाब मलिक किंवा अनिल देशमुख यांच्यामुळे आणि ईडीच्या चौकशीमुळे राष्ट्रवादी थोडी अडचणीत होती. पण, जयंतरावांनी परिवार संवाद यात्रा समारोपाला राष्ट्रवादी राज्यातला नंबर एकच पक्ष करू, असा संकल्प बोलून दाखवला. राष्ट्रवादीने संघटन आणि मतपेटी यावर लक्ष केंद्रीत करुन आपला बाणा दाखवला आहे. राष्ट्रवादीच्या इस्लामपूर सभेत आमदार अमोल मिटकरी यांच्या नकला, मंत्रपठण यासह टिंगलटवाळी उडवून दिली आणि त्यांचा मनमुराद आनंद घेणारे जयंत पाटील, धनंजय मुंढे सर्वांनी बघितले. त्यानंतर मिटकरींचा निषेध झाला. राष्ट्रवादीने हात झटकले, ब्राह्मण महासंघ व वेगवेगळे पुरोहित संघ यांनी निषेध, मोर्चे काढले. वरवर हे ओघाचे वाटल असले तरी ती राष्ट्रवादीची, शरद पवारांची रणनीती आहे, हे समजून घेतले पाहिजे. हनुमान चालीसा पठण हा विषयही शिवसेनेला अडचणीत आणणारा आहे. अशावेळी काँग्रेसने प्रशांत किशोर यांना सोबत घेऊन मिशन 370 आखले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत देशात 370 लोकसभा मतदार संघात काँग्रेस द्वितीय स्थानावर होती. ते 370 मतदारसंघ मित्र पक्षांच्या मदतीने लढवायचे आणि काँग्रेसचे पुनरूज्जीवन साधायचे असा तो फॉर्म्युला आहे. प्रशांत किशोर यांची अनेक राजकीय पक्षात उठबस आहे. भाजप, शिवसेना यासह नितीश कुमार व राष्ट्रवादी काँग्रेस यांना त्यांनी आपली सेवा पुरविली आहे. निवडणूक जिंकायचा हमखास फॉर्म्युला म्हणून त्यांच्या रणनीतीकडे बघितले जाते. त्यांची ही व्यावसायिक सेवा आता काँग्रेसला मिळणार आहे. काँग्रेस बरोबर त्यांच्या काही बैठका व काँग्रेस नेत्यासमोर काही प्रेझेंटेशन्स् झाली आहेत. यांनी काँग्रेसला जी रणनीती सांगितली आहे. त्यानुसार पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष व तो गांधी कुटुंबा बाहेरचा हा मुख्य सल्ला आहे. जोडीला मित्र पक्षाशी आघाडी करण्याचा सल्ला आहे. प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये दाखल होणार, असेही म्हटले जाते आहे. एकूणच काँग्रेस पक्ष कुस बदलण्याच्या मुडमध्ये आहे. या नव्या हालचालींना भाजपा विरोधक कसा प्रतिसाद देतात बघायचे. मोदी-शहा-योगीही कच्च्या गुरुचे चेले नाहीत. त्यांनीही राम मंदिराला गती आणि समान नागरी कायद्याचे सूतोवाच केले आहे. राजकारण ढवळून निघते आहे. जातीय मतपेटय़ा मजबूत केल्या जात आहेत. जाती-जातीत व धर्मा-धर्मात वाद-भांडणे लावून राजकीय पोळय़ा भाजल्या जात आहेत. तूर्त काँगेसचे मिशन-370 व भाजपाचा समान नागरी कायदा हे विषय ऐरणीवर आहेत.
Previous Articleसिद्धी ईश्वरप्राप्तीत विघ्न उभे करतात
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








