विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांची माहिती
प्रतिनिधी / मडगाव
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे पाचही सदस्य ‘कोविड-19’ या साथीच्या आजाराविरुद्ध लढा देण्यासाठी पुढच्या एका वर्षाचा 30 टक्के पगार मुख्यमंत्री मदत निधीला देतील, अशी माहिती विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी दिली आहे.
काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचविलेल्या पगाराच्या 30 टक्के कपातीला पाठिंबा दिला आहे. काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱया सर्व खासदारांचा पगार 30 टक्के कपात करण्याचा निर्णय यापूर्वीच सोनिया गांधींनी घेतला होता. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला होकार देताना आम्ही आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या उदात्त निर्णयाचे समर्थन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे श्री. कामत यांनी म्हटले आहे.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाने सर्वांना आवाहन केले आहे की, सर्वांनी सामाजिक अंतर ठेवावे व सर्व अधिकाऱयांना सहकार्य करावे आणि सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करावे. कोरोना व्हायरस दूर करण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. या साथीच्या आजारामुळे लोकांना होणारी गैरसोय सहन करावी लागेल असेही श्री. कामत यांनी म्हटले आहे.









