अमरनाथ पणजीकर यांचा आरोप : मंत्री आजगावकर ‘गब्बर’
प्रतिनिधी/ पणजी
काँग्रेसची जनतेची विषय घेऊन चालू असलेली आंदोलने भाजपला आणि सरकारला दुखत असून पर्यटनमंत्री बाबू आजगावकर हे मात्र दिवसेंदिवस ‘गब्बर’ होत असल्याची टीका काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. आजगावकरांनी आपल्या सग्या सोयऱयांना विविध ठिकाणी सरकारी पदे बहाल केली असून त्यांना घेऊन 75 लाखांच्या विदेशी वाऱया केल्याचा दावाही काँग्रेसने केला आहे. याबाबत त्यांनी खुलासा करावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी भाजपचे मंत्री आजगावकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, 30 टक्के कामिशन म्हणून प्रसिद्ध असलेल्या आजगावकरांनी काँग्रेसच्या नेत्यांना ‘चिल्लर’ म्हटले. ते जर ‘चिल्लर’ आहेत तर तुम्ही ‘गब्बर’ असल्याचा टोमणा आजगावकरांना मारुन त्यांनी कर्निव्हल शिमगोत्सव 2020 ची बक्षिसे अजून दिली नसल्याचे निदर्शनास आणले. तेथे 30 टक्के कमिशन मिळाले नाही म्हणून ती रक्कम दिली नसल्याचा आारेपही पणजीकरांनी केला.
ट्रव्हल आणि टय़ुरिझम असोसिएसन ऑफ गोवा (टीटीएजी) या संस्थेने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे आजगावकरांची 30 कमिशन खाणारे मंत्री म्हणून लेखी तक्रारही केली होती. भाजपचे आमदार दयानंद सोपटे यांनी विधानसभेत 30 टक्के कमिशन खाणाऱयांविरोधात आवाज उठविला होता. परंतु डॉ. सावंत यांनी कोणतीच कारवाई केली नाही. खूर्ची सांभाळावी म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असेही पणजीकर यांनी पुढे सांगितले.
क्रीडामंत्री म्हणूनही ते आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करून फक्त बहुजण समाजाचा उदोउदो करतात आणि आपल्या सोयऱयांना पदे देतात, अशी टीकाही पणजीकर यांनी केली आहे.









