केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचा आरोप
प्रतिनिधी/ बेळगाव
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या विधेयकाविरोधात काँग्रेस पक्ष शेतकऱयांची दिशाभूल करत आहे. शेतकऱयांना हे विधेयक फायदेशीर आहे. असे असताना शेतक ऱ्याची दिशाभूल करून काँग्रेस पक्षाने आपण कमिशन एजंटांचा पक्ष असल्याची टीका केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली असून गरिबांचे शोषण काँग्रेसच करत आला आहे, असा आरोपदेखील त्यांनी केला आहे.
भाजपने नेहमीच शेतकऱयांना मदतीचा हात पुढे केला आहे. एपीएमसीचा कायदा हा शेतकऱयांना फायदेशीर आहे. कारण एपीएमसीमधून एजंट गायब होणार आहेत. असे असताना काँग्रेस पक्ष शेतकऱयांची दिशाभूल करत असून काँग्रेसच आता एजंटांचे काम करत आहे, असा आरोप प्रल्हाद जोशी यांनी केला आहे.
काँग्रेसने आजपर्यंत आश्वासने दिली आहेत. मात्र ती आश्वासने कधीच पूर्ण केली नाहीत. भाजपने शेतकऱयांच्या हिताच्यादृष्टीने कायदे करत असताना त्याला कॉग्रेस विरोध करत आहे. या नवीन कायद्यांमुळे शेतकऱयांना स्वतःचा माल स्वतः विक्री करायला मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱयांना हा कायदा फायदेशीर असल्याचे स्पष्ट केले. यावेळी उपपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, सरकारचे मुख्य सदस्य महांतेश कवटगीमठ, राज्यसभा सदस्य ईरण्णा कडाडी, आमदार अनिल बेनके उपस्थित होते.









