उमेदवारांच्या चाचपणीच्या दृष्टीने भेट महत्त्वाची : देसाई
वार्ताहर /खोल
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव 6 रोजी प्रथमच काणकोण मतदारसंघाला भेट देणार आहेत. श्रीस्थळ पंचायत सभागृहात मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची ते भेट घेणार असून इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यासंदर्भात ही भेट महत्त्वाची असल्याचे काणकोणातील एक इच्छुक उमेदवार व प्रदेश काँग्रेस सचिव महादेव देसाई यांनी काणकोणात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले.
काणकोण मतदारसंघात काँग्रेसच्या वतीने केवळ आपण व जनार्दन भंडारी या दोनच नावांचा समावेश असून आपण प्रथम स्थानावर आहे, असा दावा देसाई यांनी यावेळी केला. येत्या सोमवारपासून गावडोंगरी, खोतीगाव, लोलये, पैंगीण, श्रीस्थळ व आगोंद पंचायतींतील तसेच नगरपालिका क्षेत्रातील मतदारांच्या घरोघरी भेट देऊन त्यांच्या समस्या ऐकून घेणार आहे. काणकोण मतदारसंघात येत्या काही दिवसांत आपण आपले कार्यालय उघडणार आहे, असे त्यांनी सांगितले.
काणकोण मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा समर्थक व बालेकिल्ला राहिलेला असून त्याचा प्रत्यय 2012 व 2017 च्या निवडणुकांत दिसून आलेला आहे. मतदारांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी पक्षाशी प्रतारणा केली, तरी मतदार मात्र पक्षाशी एकनि÷ आहेत. याचा अनुभव आपल्याला पावलोपावली येत आहे. भाजप सुडाचे राजकारण खेळत असून भाजपाचा पराभव करणे हेच आपले व आपल्या पक्षाचे ध्येय आहे, असे देसाई यांनी सांगितले.
काँग्रेस पक्ष उमेदवारीची घोषणा निवडणुकीच्या काही दिवस पूर्वी किंवा अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या काही तास आधी करतो. तसाच गोंधळ यावेळीही होणार का व ऐन वेळी भलताच उमेदवार जाहीर झाल्यास आपली भूमिका कोणती राहील या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना, आपली उमेदवारी पक्की असून यदाकदाचित आपल्याला उमेदवारी नाकारली गेली, तरी भाजपाचा पराभव करणे हे पक्षाचे ध्येयच आपले अंतिम साध्य राहणार आहे, असे देसाई म्हणाले. काणकोण मतदारसंघात काँग्रेसचे सभासद वाढवण्याच्या बाबतीत आपण भरीव कार्य केले आहे. सुमारे 1500 नवे सभासद आपण नोंदवले आहेत. युवा कार्यकर्त्यांची फळी आपल्यासोबत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावेळी त्यांच्यासोबत राजेंद्र वेळीप व उल्हास वेळीप उपस्थित होते.









