भाजप अध्यक्षांचे सोनिया गांधींना 4 पानी पत्र
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना महामारीदरम्यान वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या वर्तनासंबंधी पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी पत्र लिहिले आहे. चार पानी पत्रात नड्डा यांनी महामारी आणि संकटाच्या या काळात काँग्रेसच्या वर्तनामुळे दुःखी आहे, पण हैराण झालो नसल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे काही नेते लोकांना मदत करण्याचे कौतुकास्पद कार्यही करत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. देश कोरोनाशी लढत असताना काँग्रेस गोंधळ निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
काँग्रेसच्या काही नेत्यांच्या कौतुकास्पद कार्यांवर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून फैलावण्यात येत असलेल्या नकारात्मकतेमुळे ग्रहण लागत आहे. भारत कोरोना महामारीच्या विरोधात अत्याधिक साहसासह लढत असताना काँग्रेसच्या नेत्यांनी लोकांची दिशाभूल करणे बंद करावे असे प्रत्येकाला वाटत असावे. लोकांमध्ये खोटी भीती निर्माण करण्यात येत आहे. याचबरोबर काँग्रेस नेते राजकीय विरोधाच्या आधारावर भूमिका मांडत असल्याचा आरोप नड्डा यांनी पत्रात केला आहे.
गरीब, वंचितांना मोफत लस
भाजप आणि रालोआ सरकारांनी यापूर्वीच गरीब आणि वंचित लोकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसची सरकारे देखील गरीबांसाठी असाच निर्णय घेतील असा पूर्ण विश्वास आहे. राज्यांमधील काँग्रेस सरकार मोफत लस देण्याची घोषणा करतील का असा प्रश्न नड्डा यांनी पत्राद्वारे सोनियांसमोर उपस्थित केला आहे.
पत्र पोहोचले नाही, तरीही उत्तर
1 नोव्हेंबर 2020 रोजी सोनियांनी मला पत्र लिहिल्याचे प्रसारमाध्यमांद्वारे कळले, पण अद्याप असे कुठलेच पत्र मिळालेले नाही. तुम्ही हे पत्र केवळ सोशल मीडियासाठी तयार केले असावे असे वाटते. हा प्रकार पूर्णपणे राजकारणासाठी होता. तरीही प्रसारमाध्यमांद्वारे पोहोचलेल्या पत्राला मी उत्तर देत आहे, जेणेकरून लोकांची दिशाभूल करण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी होणार नाही असे नड्डा यांनी नमूद पेले आहे.









