
प्रतिनिधी /वास्को
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी मुरगाव मतदारसंघात घरोघरी प्रचार करून काँग्रेंस पक्षालाच मत देण्याचे आवाहन केले. घरोघरी संपर्क करून मतदारांशी संवाद साधण्याचा हा कार्यक्रम हेडलॅण्ड सडय़ावरील जीआरबी कॉलनीमध्ये आयोजित करण्यात आला होता. राहुल गांधी या भागात सुमारे एक तास होते. त्यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम, गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडूराव, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेश अध्यक्ष गिरीष चोडणकर, उपाध्यक्ष व मुरगावचे उमेदवार संकल्प आमोणकर, अलका लांबा, राष्ट्रीय युवा अध्यक्ष बी. वी. श्रीनिवास, नगरसेविका श्रध्दा आमोणकर व इतर मान्यवर नेते उपस्थित होते.
शुक्रवारी दुपारी राहुल गांधी यांचे हेडलॅण्ड सडय़ावर आगमन झाले. नियोजित कार्यक्रमानुसार त्यांनी संकल्प आमोणकर यांच्या विजयासाठी घरोघरी प्रचार केला. जीआरबी कॉलनीमध्ये बऱयाच कुटुंबांशी राहुल गांधी यांनी संवाद साधला. काही घरांमध्ये काही वेळ बसून महिलां, मुले, पुरूष व वयस्क लोकांशी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. कुटुंबांची विचारपुस केली. गांधी यांच्या लोकांमधील दिलखुलास वागण्यामुळे या कुटुंबियांनाही हुरूप आला. यावेळी चर्चेचे रूपांतर मैत्रीमध्येही झाले. काहींनी त्यांच्यासोबत फोटोही घेतले. लोकांनी त्यांच्याकडे अनेक समस्यांसंबंधी तक्रारीही मांडल्या. गोव्यात स्वच्छ आणि स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसच्याच उमेदवाराला निवडून आणण्याचे आवाहन जीआरबीमधील कुटुंबांना केले. राहुल गांधी तासभर या वसाहतीत होते. मुरगाव काँग्रेसचे कार्यकर्ते व जीआरबी कॉलनीतील लोकांनी त्यांचे स्वागतही उत्स्फुर्तपणे केले. संध्याकाळी राहुल गांधी यांनी मुरगावमधील कार्यकर्त्यांशी स्वातंत्ररीत्या वर्च्युअल संवादही साधला.









