प्रतिनिधी / कसबा बीड
राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना नागरिकांना पुरेसे पाणी देण्यात खूप चांगल्या प्रकारे यश आले आहे, मात्र सांडपाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामपंचायतींना अपयश आले आहे. सांडपाण्याची योग्य व्यवस्था न केल्यामुळे गावच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कसबा बीड, ता. करवीर या गावातील शेतकरी या सांडपाण्याने हैराण झाले आहेत. तर, शेतजमिनीत सांडपाणी जाऊन जमीन नापीक होणाच्या मार्गावरती असल्याने ग्रामपंचायतीने सांडपाण्याची योग्य व्यवस्था करावी अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे.
वाढत्या लोकसंख्येचा विचार करून ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्यासाठी पेयजल योजना मंजूर केली आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने लाखो रुपयांचा निधी देऊन योजना सुरू केली पण, सांडपाण्याची योग्य व्यवस्था करण्यासाठी राज्य सरकारकडून पुरेसा निधी मिळाला नसल्याने सांडपाणी वाया जाऊ लागले आहे. राज्यातील ठरावीक गावांमध्येच पुरेसा निधी मिळाल्याने सांडपाण्याची योग्य व्यवस्था झाली आहे तर, अनेक गावात सांडपाणी वाया जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन जमीन नापीक होण्याच्या मार्गावर आहे, तर काही ठिकाणी जमिनी नापीक झाल्या आहेत.
गावातील येणारे सांडपाणी गटारीतून गावाच्या वेशीपासूनपुढे चरीच्या माध्यमातून सोडले जाते पण, तिथून पुढे कोणताही पर्याय केलेला नाही. वेळोवेळी ग्रामपंचायतीला तोंडी व लेखी तक्रार देऊनही यावरती कोणताही ठोस निर्णय घेतला गेलेला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकर्यांनी आझाद हिंद झेंडयाजवळ गटारीतच मुरूम टाकून सांडपाणी अडवलेले आहे. जोपर्यंत सांडपाण्याचा बंदोबस्त पूर्णपणे होत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नसल्याचे शेतकर्यांनी सांगितले. बीड गावातील राकेश वरुटे यांच्या पश्चिमेस ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा आहे, तिथेच सांडपाण्याचा फिल्टर हाऊस बसवून चांगल्या प्रकारे उपाययोजना होण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाने त्वरित लक्ष घालून दुषित सांडपाण्याचा बंदोबस्त करावा, अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.