प्रतिनिधी / कोल्हापूर
पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात सुज्ञ मतदारांनी महाविकास आघाडीला घवघवीत यश देत भाजपला चांगलीच चपराक बसली आहे. या पुढे ही कसं लढायचं ते आमचं आम्ही ठरवतो, दोन चेहरे असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी पराभवाचे आत्मचिंतन केलेलं बरे, आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही. असा पलटवार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. निकालानंतर पाटील यांनी एकटे एकटे लढा, असे आव्हान दिले होते. यावर मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत बोलत होते. या निकालाने सत्ता आणि संपत्तीची मस्ती नसावी हा धडाही जनतेने भाजपला दिला आहे. असा टोलाही मुश्रीफ यांनी लगावला.
ते म्हणाले, केंद्रातील सत्तेचा गैरवापर करुन भाजपने सुशांतसिंह, कंगणा राणावत प्रकरणात महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान केले. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड चिड होती. प्रताप सरनाईक, शरद पवार यांना इडीची नोटीस देवून वातावरण कलुशीत करण्याचे काम केले. त्यांना सत्ता आणि संपत्तीची मस्तीतून हे कृत्य सुरु केले. हे न पटल्याने जनता संधी शोधत होती. या निवडणुकीत भाजपचा पराभव करुन सत्ता आणि संपत्तीची मस्ती आणि सुडाची भावना नसावी असा संदेशच जनतेने दिला आहे. सुशिक्षीत मतदारांमध्ये इतका रोष आहे.
तर सर्वमान्य जनतेत किती असेल, याचा विचार भाजपने करावा, कोणतीही सार्वत्रीक निवडणूक होवू दे त्यांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, हे या निकालावरुन स्पष्ट झाल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. या पुढील सर्वच निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत अशी भूमिका त्यांनी मांडली. मंत्रीमंडळाच्या निर्णयाचा आदर करुन राज्यपालांनी 12 आमदांच्या नावाला लकरात लवकर मान्यता दिली पाहिजे. मंत्री असताना चंद्रकांतदादांनी मला राजकीय आणि समाजिक जिवनातून कायमचे उठवण्याचा प्रयत्न केला म्हणून माझा त्यांच्यावर सात्विक राग आहे.
असे शेवटी मुश्रीफ म्हणाले. स्थानिक पातळीवर राजकारणाचे संदर्भ वेगळे असतात कार्यकर्त्यांना संधी देणे आवश्यक असते. एकत्र लढलो तर कार्यकर्ते अन्यत्र जावून नुकसान होणाचा धोका असतो, त्यामुळे स्वतंत्र लढू काही प्रसंगी मैत्रीपूर्ण लढती होतील. असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.