बोरी गावात भव्य स्मारकाचा संकल्प
प्रतिनिधी /फोंडा
गोमंतकीय सुपुत्र कै. पद्मश्री कवीवर्य बा. भ. बोरकर यांच्या नावे बोरी गावात भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प कवी बोरकर स्मारक प्रतिष्ठानने केला आहे. त्याच्याच एक भाग म्हणून मंगळवार 30 रोजी सायं. 4.30 वा. फोंडा येथील राजीव गांधी कलामंदिरमध्ये ‘कांचन संध्या’ हा कवीवर्य बोरकरांच्या कवितांवर आधारीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
बा. भ. बोरकर यांच्या कन्या मुक्ता आगशीकर व प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ. घनश्याम बोरकर यांनी फोंडा येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. काव्यवाचन व कवितांचे गायन असे या कार्यक्रमाचे स्वरुप असेल. बोरकरांच्या कवितांचे गायन सुभाष परवार हे करणार असून त्यांना दत्तराज सुर्लकर, विठ्ठल मेस्त्री व योगेश रायकर हे कलाकार साथसंगत करणार आहेत. पुणे येथील स्वानंद गोडबोले व अन्य कलाकार हा कार्यक्रम सादर करणार आहे. या कार्यक्रमप्रसंगी बोरी कोमुनिदादतर्फे स्मारकासाठी भूखंड प्रदान करणारे अधिकृत पत्र स्मारक प्रतिष्ठानच्या विश्वस्तांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला शिरोडय़ाचे आमदार सुभाष शिरोडकर, बोरी कोमुनिदादचे अध्यक्ष नमेश बोरकर, मुखत्यार मनोज बोरकर, खजिनदार राजेंद्र प्रभदेसाई, सचिव अनिल साळगावकर, बोरीच्या सरपंच ज्योती नाईक, उपसरपंच दिपीका नाईक व इतर पंचसदस्य उपस्थित राहणार आहेत.
अशी आहे बोरकर स्मारकाची संकल्पना
बा. भ. बोरकर यांची कविता निसर्गाच्या सानिध्यात फुलली व बहरली. त्यामुळे बोरी गावातील निसर्गरम्य व प्रशस्त अशा जागेत बोरकर स्मारक उभारण्याच्या प्रतिष्ठानचा संकल्प आहे. बेरकरांचे चाहते व साहित्यप्रेमींसाठी हे स्थळ म्हणजे ‘काव्यतीर्थ’ व्हावे असे डॉ. घनश्याम बोरकर यांनी सांगितले. ही वास्तू म्हणजे साहित्यिक व सांस्कृतिक वारसा ठरावा. बोरकर व त्यांची काव्य अनुभवता येईल अशी असे प्रवेशद्वार, समोर कवी बोरकरांचा पुतळा, समीक्षा दालन, कोकणी व मराठी कवितांचे दालन, विविध भाषांमधील काव्यदालन, बोरकरांच्या काव्य प्रवासाचा आढावा घेणारे ओडिओ व व्हीडीओ दालन, संगीत दालन असे एकंदरीत नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. बोरकरांच्या कविता या चित्रदर्शी असल्याने त्यांच्या काव्यातून उमटणाऱयांच्या चित्रांचे दालन हे अन्य एक वैशिष्टय़ असेल. याशिवाय संगीत क्षेत्रात जागतिक किर्ती मिळविलेले गोव्यातील प्रतिभावंत चित्रकार व संगीत क्षेत्रातील कलाकारांच्या स्मृती जागविणारे एक दालन या ठिकाणी असेल. पुस्तक विक्री प्रदर्शक व गोव्यातील पारंपरिक वस्तूंचे प्रदर्शन, ज्यातून स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. गावातील मुलांसाठी अभ्यासिका ही आणखी एक संकल्पना आहे. कवी बोरकर हे निसर्गाचे उपासक होते. या निसर्गांचे सौंदर्य खुलविणारा बगीचा, आकर्षिक कारंजी, मोकळय़ा जागेत उभारली जातील. बा. भ. बोरकरांना नेहमीच खुलविणारा निसर्ग या दालनाच्या मोकळय़ा जागेत दिसणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली.









