गेल्या अनेक दिवसापासून पोलिसांना देत होता चकवा
इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आवळल्या मुसक्या
आता पर्यत तिघे अटकेत तर मुख्य गुन्हेगारासह आणखीन एक पैलवान पसार
प्रतिनिधी / इचलकरंजी
कोल्हापूरातील कळंबा कारागृहामध्ये फेकण्यात आलेल्या मोबाईल आणि गांजाप्रकरणी आणखीन एका युवकाला पोलिसांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास रंगेहाथ पकडले. राजेंद्र उर्फ दादया धुमाळ (रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ) असे त्याचे नाव असल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून समजते. तो गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होता.
संशयीत आरोपी धुमाळमुळे या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीची संख्या तीन झाली आहे. तर या प्रकरणाचा मुख्य म्होरक्या व पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार भीष्मा उर्फ भीमा सुभेदार चव्हाण (रा. रांजणी, ता. कवठेमंहाकाळ) आणि त्याचा साथीदार पैलवान जयपाल किसन वाघमोडे (रा. कडेगाव, जि. सांगली) हे दोघे जण अद्यापी पसार असून, या दोघांचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी कळंबा कारागृहात दहा मोबाईल हॅण्डसेट, पेन ड्राईव्ह, मोबाईल चार्जर आणि गांजा मोटारीमधून आलेल्या दोघा अज्ञात युवकांच्याकडून फेकण्यात आला होता. या प्रकरणानंतर कारागृहाची झडती घेतली असता पुन्हा मोबाईल हॅण्डसेट व मोबाईल बॅटऱ्या सापडल्या होत्या. या प्रकरणाचा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या दाखल प्रकरणाचा गांभीर्याने दखल घेवून पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कोल्हापूर व इचलकरंजी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून यातील सहभागी युवकासह त्यांचा म्होरक्याच्या मुसक्या आवळण्याविषयी सक्त आदेश दिला होता. त्यावरून इचलकरंजी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी या प्रकरणातील पैलवान ऋषीकेश सदाशिव पाटील (रा. कोदवडे, ता. राधानगरी), शुभम सोपान ऐवळे (रा. शहापुर, ता. हातकणगंले) या दोघांना अटक केली. तर मुख्य म्होरक्या गुन्हेगार भीष्मा उर्फ भीमा चव्हाण, पैलवान जयपाल वाघमोडे, राजेंद्र उर्फ दादया धुमाळ हे तिघे पसार झाले होते. या तिघांचा पोलीस शोध घेत असून, ते सर्व जण पोलीसांना चकवा देण्यात यशस्वी होत असल्याने अजून ही सापडले नाहीत.
पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी मंगळवारी रात्री जिल्ह्यात कोबिंग ऑपरेशन राबविण्याबाबतचा आदेश दिला होता. त्यावरून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी सुरु केली होती. याच दरम्यान इचलकरंजी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांना संशयीत आरोपी धुमाळ हा जयसिंगपूर शहरालगत येणार असल्याची माहिती बातमीदाराकडून समजली. त्यावरून पोलीस निरीक्षक जाधव यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मदतीने बुधवारी पहाटेच्या सुमारास धुमाळला रंगेहाथ पकडून त्यांच्या मुसक्या आवळण्यास यश मिळविले, असल्याची विश्वसनीय सुत्रांनी दिली.









