ज्येष्ट पत्रकार विजय कुवळेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन : पत्रकारितेतील अनेक पुरस्कारांचे मानकरी
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावचे प्रसिद्ध चित्रकार, कलामहषी के. बी. कुलकर्णी यांचा स्मृतिदिन बुधवार दि. 9 मार्च रोजी वरेरकर नाटय़ संघ येथे आचरण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून यानिमित्त पेंटिंग स्पर्धा, प्रदर्शन, प्रात्यक्षिके, गौरव पुरस्कार प्रदान व व्याख्यान असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून ज्ये÷ पत्रकार विजय कुवळेकर तर अध्यक्ष म्हणून ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर उपस्थित राहणार आहेत.
विजय कुवळेकर यांचा परिचय पुढीलप्रमाणे-
राजकीय, सामाजिक विषयांवर तसेच ललित साहित्याच्या दालनात कुवळेकर यांनी मुक्त संचार केला आहे. कथा, कादंबरी, ललित, वैचारिक, लघुनिबंध, इतिहास, नाटक व गीत लेखन या क्षेत्रात त्यांचे लेखन आहे. चित्रपटांसाठी कथा, पटकथा, संवाद आणि गीतेही त्यांनी लिहिली आहेत. स्मिता पाटील व गिरीश कर्नाड यांचा अभिनय असलेल्या चंद्रकांत जोशी दिग्दर्शित ‘सूत्रधार’ या चित्रपटाची कथा व पटकथा कुवळेकर यांची आहे. ‘रावसाहेब’ या चित्रपटासाठी त्यांना कथा, पटकथा, संवाद व गीत लेखनासाठी पुरस्कार मिळाले आहेत.
महत्त्वाच्या पदांवर काम
नाटय़लेखन व अभिनय तसेच रंगमंचयी सादरीकरण त्यांनी केले आहे. के. बी. कुलकर्णी, रवी परांजपे यांच्यासह अनेक चित्रकारांच्या कलाकृतींचे रसग्रहण त्यांनी केले आहे. सकाळ वृत्तपत्राचे मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम केले असून अनेक वृत्तपत्रांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
पत्रकारितेतील अनेक पुरस्कार त्यांना मिळाले असून त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा लोकमान्य टिळक पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार, बाळशास्त्राr जांभेकर पुरस्कार, नरुभाऊ लिमये पुरस्कार महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून त्यांनी काम केले आहे.









