प्रतिनिधी / बेळगाव
कलाकाराला भूमिकेचे मर्म ओळखता आले पाहिजे. नाटक मेंदूत चढले पाहिजे तरच नट-नटी त्याच्याशी एकरुप होऊ शकतात. लपलेला अभिनय बाहेर काढण्यासाठी नाटय़ शिबिरांची गरज आहे. असे मत अनिल चौधरी यांनी व्यक्त केले.
वरेरकर नाटय़ संघ आयोजित नाटय़ शिबिराची सांगता शनिवारी संध्याकाळी झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अनिल चौधरी बोलत होते. व्यासपीठावर संघाचे सचिव जगदीश कुंटे व प्रशिक्षक अनिरुद्ध ठुसे, नीता कुलकर्णी उपस्थित होत्या.
अनिल चौधरी म्हणाल,s नाटकासाठी महत्त्वाचा भाग म्हणजे दोन डोळे, नाटक त्यामधून अभिव्यक्त होते. बेळगावमध्ये पहिले संगीत शाकुंतल झाले. त्यामुळे बेळगाव खऱया अर्थाने नाटकाचे माहेरघर आहे. नाटय़क्षेत्राला मोठी परंपरा आहे. त्याचा अभ्यास केला पाहिजे. गडकरींची नाटके विकत घ्या, व मोठय़ाने वाचा जेणेकरून जिभेला वळण येईल, असेही सांगितले. प्रारंभी जगदीश कुंटे यांनी स्वागत केले. व पाहुण्यांचा सत्कार केला. यानंतर सर्व शिबिरार्थींना प्रमाणपत्र देण्यात आले.









